पुणे : बहुजननामा ऑनलाईन – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ११५ वा पदवीप्रदान समारंभ येत्या दि. २१ जून रोजी (शुक्रवार) आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख आतिथी म्हणून मा. डॉ. बैरत्राँ द हार्टिंग (भारतातील फ्रेंच दूतावासातील अधिकारी) हे उपस्थित राहणार आहेत. ते स्नातकांना उद्देशून दीक्षांत भाषण करतील अशी माहिती विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आली आहे. यासंदर्भात विद्यापीठ प्रशासनाने एक प्रेस नोट काढली आहे.
दरम्यान, सन २०१७-१८ मध्ये आणि त्याआधी उत्तीर्ण झालेल्या विविध विद्याशाखांमधील पदवी व पदव्युत्तर स्तरावरील ६२१२ विद्यार्थ्यांना विद्यापीठात पदवी प्रमाणपत्रे वितरित करण्यात येणार आहेत. यापैकी १२७ विद्यार्थ्यांना पीएच.डी. पदवीची प्रमाणपत्रे व ६ विद्यार्थ्यांना सुवर्णपदके प्रदान करण्यात येणार आहेत
पदवी प्रमाणपत्रांचे वितरण २१ जून २०१९ रोजी विद्यापीठ परिसरातील प्रशासन भवनाजवळ परीक्षा भवनामध्ये सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत केले जाणार आहे. अनुपस्थित विद्यार्थ्यांची प्रमाणपत्रे पदवी प्रदान कार्यक्रमानंतर लगेचच संबंधित विद्यार्थ्यांना पोस्टाद्वारे पाठवण्यात येतील.