बहुजननामा ऑनलाइन टीम – महाविकास आघाडीच्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार 30 डिसेंबरला होणार असल्याची चर्चा सुरु आहे. 30 डिसेंबरला दुपारी 1 वाजता शिवसेना-कॉंग्रेस-राष्ट्रवादी या तीन पक्षातील मंत्री शपथ घेतल्याची माहिती मिळाली आहे. यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी 13 मंत्री असतील, तर कॉंग्रेसच्या वाट्याला 10 मंत्रिपदे येणार असल्याची माहिती मिळाली आहे.
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारासाठी जोरदार हालचाली सुरू आहेत. मात्र कॉंग्रेस हायकमांडकडून पक्षातील मंत्र्यांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यात न आल्याने मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडला मात्र, आता मंत्रिमंडळ विस्ताराची नवी तारीख समोर आली आहे.
राष्ट्रवादीतून उपमुख्यमंत्रिपदासाठी अनेक नेते इच्छुक आहे. यामध्ये पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, जयंत पाटील आणि अजित पवार हे तीन नेते आघाडीवर आहे. मात्र, उपमुख्यमंत्रिपद अजित पवार यांच्याकडे जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. कारण राष्ट्रवादीत अजित पवार समर्थक मोठा गट आहे. अजित पवार यांना उपमुख्यमंत्रिपद मिळावं, यासाठी त्यांच्या समर्थकांचा पक्षावर दबाव आहे. त्यामुळे सरकारला स्थिरता आणण्यासाठी राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्रिपदासाठी अजित पवार यांच्या नावावरच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
मंत्रिमंडळ विस्तारात कॉंग्रेसकडून अशोक चव्हाण, विजय वड्डेचीवार, अमित देशमुख, सतेज पाटील, यशोमती ठाकूर, वर्षा गायकवाड, प्रणिती शिंदे, विश्वजित कदम यांना संधी देण्यात येण्याची शक्यता आहे. दुसरीकडे बाळासाहेब थोरात यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी कायम ठेवायची की पृथ्वीराज चव्हाण यांना नेमायचे याबाबत अजून अंतिम निर्णय येणं बाकी आहे.