दिल्ली वृत्तसंस्था – दिल्लीमध्ये एक अनोखा किस्सा घडला. एका मुलीचा मोबाईल हिसकावून चोर घेऊन पळून गेले परंतू काही वेळातच तिचा मोबाईल तिला परत मिळाला. मोबाइल परत मिळाल्यामुळे ती मुलगी खूप खुश झाली पण तिचा आनंद जास्त काळ टिकला नाही, जेव्हा तिच्या लक्षात आले की, परत केलेला मोबाईल तिचा नाही तेव्हा तिला खूप धक्का बसला. एवढे होऊन देखील तिला दिलासा मिळाला. कारण या हा सर्व प्रकार कॅमेऱ्यामध्ये कैद झाला होता. हा प्रकार शुक्रवारी दिल्लीच्या मुखर्जी नगरच्या कोरोनेशन पार्कमध्ये घडला.
जेव्हा मुलगी ई-रिक्षाने किंग्सवे कॅपच्या दिशेने जात होती. मुलीने सांगितले की, ‘मी माझा मोबाईल ई-रिक्षामध्ये बाजुला ठेवला होता त्याचवेळी दुचाकीवरुन आलेल्या दोन तरुण माझा मोबाईल घेऊन पळून गेले. मी लगेच रिक्षातून उतरले आणि एका कारच्या मदतीने त्या चोरांचा पाठलाग केला. कार चालकाने त्यांना पकडले. कार चालक त्या चोरांशी बोलतानाचा व्हिडिओ त्या कार चालकाने मोबाईलमध्ये शूट केला. कार चालकाने त्या चोरट्यांना दम दिल्याने त्या चोरांनी माझा मोबाईल परत केला.’
तरुणीने काही वेळानंतर आपला मोबाईल पाहिला तेव्हा तिला कळाले की, तो मोबाईल तिचा नव्हता कारण त्या मुलीचा मोबाईल काळ्या कलरचा होता आणि तिला पांढऱ्या कलरचा मोबाईल चोरट्यांनी परत केला होता. मोबाईलमध्ये सिमकार्ड देखील नव्हते आणि तो मोबाईल फ्लाइट मोडवर होता. या मुलीला मोबाईल परत करतानाचा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये कार चालकाने शूट केला होता. त्यामुळे आता चोरट्यांचा शोध सुरु झाला आहे. दिल्लीच्या डेप्युटी कमिश्नर विजयंता आर्या यांनी सांगितले की, या व्हिडिओची तपासणी करण्यात येईल आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे याचा तपास करता येईल.