अकोला : बहुजननामा ऑनलाईन – पंढरपुरात ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत सत्ता संपादन मेळावा घेऊन वंचित बहुजन आघाडीची मोट बांधण्यात आली आहे. धनगर समाजासह अठरा पगड जाती व बारा बलुतेदार, मागासवर्गीय व मुस्लिम समाजाला सोबत घेऊन आता सत्ता मिळवण्याची तयारी केली आहे, असे प्रतिपादन माजी आमदार हरिदास भदे यांनी केले.
मूर्तिजापूर येथे आयोजित कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात धनगर मेळाव्याला संबोधताना माजी आ. भदे बोलत होते. ते पुढे म्हणाले, आमची संख्या ८५ टक्के आहे आणि १५ टक्के लोक आमच्यावर सत्ता गाजवत आहेत. आता आमचा वापर होऊ द्यायचा नाही. सर्व वंचित समाज एकत्र आले, तर आम्हाला कोणीही पराभूत करू शकत नाही. आम्हाला ॲड. आंबेडकरांच्या सोबत राहून सत्तेची कास धरावी लागेल. यासाठी धनगर समाजाचे मेळावे घेण्यात येत आहेत. धनगर समाजाची राजकीय व सामाजिक आरक्षणाची भूमिकाही त्यांनी यावेळी स्पष्ट केली.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून बळीराम चिकटे, दिनकरराव नागे, काशीराम साबळे, डॉ. मुरळ यांच्यसह अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रमुख वक्त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी विशेष कार्य करणाऱ्या समाज बांधवांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विनोद नागे, मोहन रोकडे, प्रा.एल.डी. सरोदे यांचा सत्कार माजी आ. हरिदास भदे यांच्या हस्ते करण्यात आला. संचालन प्रा.एल.डी. सरोदे, प्रास्ताविक मोहन रोकडे, तर आभार सुनील सरोदे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी बाळ शितोळे, रवी मार्कंड, प्रा. गजानन जोगळे, संकेत कोल्हे, सुनील मोटे, सुमित खाडे, मोहन पुनसे, सचिन दिवनाले, श्याम अवघड, विजय चुडे, डॉ. अभिजित मुरळ व सकल धनगर समाज बाधव उपस्थित होते.