बुलडाणा : बहुजननामा ऑनलाईन – फासे पारध्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना शैक्षणिक, आर्थिक व सामाजिकदृष्ट्या अधिक सक्षम करण्यासाठी बुलडाणा पोलीस दलाच्या वतीने ‘उन्नती पर्व-फासे पारधी पुनर्वसन प्रकल्प’ राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाचा पहिला टप्पा गेल्या आठवड्यात शेगाव येथे पार पडला असून दुसरा टप्पा मेहकर येथे पार पडणार आहे.
बुलडाणा पोलीस दलाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या उन्नती पर्व फासे पारधी पुनर्वसन प्रकल्पांतर्गत फासे पारधी समाजातील युवकांना पोलीस भरतीपूर्र्व प्रशिक्षण देण्यात येणार आहे. दहावी व बारावी उत्तीर्ण तरुणांना स्वयंरोजगार प्रशिक्षण, वाहन चालक प्रशिक्षण, महिला बचत गटांना अनुदान, पदवीधर तरुणांना स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन करण्यात येणार असून बेघरांना मोफत घरकुल वाटप तसेच अतिक्रमित जागेवर वास्तव्य करणाऱ्यांना सदर जागा त्यांच्या नावे करण्यात येणार आहे. तसेच जातीचे दाखले, जात वैधता प्रमाणपत्र तसेच इतर दाखल्यांसह रेशनकार्ड वाटप करण्यात येणार आहे. छाटणी गुणांकन प्रमापणपत्र वाटप, बेरोजगार तरुणांना सेवायोजन कार्यालयाचे प्रमाणपत्र वाटप, विविध शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांची निवड आदी कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.
मेहकर येथे १६ फेब्रुवारी रोजी या प्रकल्पाचा दुसरा टप्पा पार पडणार असून आयोजित कार्यक्रमाला अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक श्रीकांत तरवडे, बुलडाणा जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे, भागवताचार्य गजानन शास्त्री, पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, मुक्तेश्वर कुळकर्णी, मुकुंद जोशी आदी मान्यवर उपस्थित राहणार असून फासे पारधी बांधवांना मार्गदर्शन करणार आहे.
आयोजित कार्यक्रमात शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजनासंदर्भात स्टॉल उभारण्यात येणार आहे. तसेच योग्य व पात्र लाभार्थ्यांची निवड करुन कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पोलीस अधिक्षकांच्या नेतृत्वात अप्पर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी व संबंधीत कार्यक्षेत्राचे ठाणेदार परिश्रम घेत आहेत. फासे पारधी समाज बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पोलीस दलामार्फत राबविण्यात येणारा हा उपक्रम म्हणजे महत्वाचे पाऊल ठरले आहे.