कणकवली : बहुजननामा ऑनलाईन – मराठा समाज बांधवाना देण्यात येत असलेल्या जातीच्या दाखल्याबाबत प्रशासन पातळीवर होत असलेली अडवणूक दूर करावी. त्याचप्रमाणे जात प्रमाणपत्र कागदपत्रांसाठी खास कक्ष उघडण्यात यावा अशी मागणी सकल मराठा समाजाच्यावतीने प्रांताधिकारी यांच्याकडे करण्यात आली. शिवजयंती निमित्ताने मराठा समाजातील १०० बांधवाना मराठा समाज दाखल्याचे वितरण करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रशासनाने मराठा समाज बांधवाना लवकरात लवकर हे दाखले उपलब्ध होण्यासाठी सहकार्याची भूमिका ठेवावी, अशी मागणीही करण्यात आली.
मराठा समाज बांधवाना देण्यात येणाऱ्या मराठा समाज जातप्रमाणपत्राबाबत प्रशासनाकडून वेळकाढू भूमिका घेतली जात आहे. याबाबतच्या तक्रारी सकल मराठा समाज अध्यक्ष ॲड. सुहास सावंत यांच्यासह मराठा समाज पदाधिकाऱ्यांकडे आल्यानंतर कणकवली येथे सकल मराठा समाज बांधवानी प्रांताधिकारी नीता शिंदे-सावंत यांची भेट घेतली. नगरसेवक सुशांत नाईक, शैलेश भोगले, ॲड. हर्षद गावडे, रुपेश आमडोसकर, अनुप वारंग, महेश सावंत, ललित घाडीगावकर, समर्थ राणे, तेजस राणे, पप्पू पुजारे व मराठा बांधव उपस्थित होते.
ॲड. सुहास सावंत व नगरसेवक सुशांत नाईक यानी मराठा समाज बांधवाना जातीचे दाखले देण्याबाबत प्रशासनाकडून विलंब का केला जात आहे, याबाबत प्रांताधिकाऱ्यांनी विचारणा केली असता त्या म्हणाल्या, मराठा समाज बांधवाना जात प्रमाणपत्र देण्यासाठी आवश्यक ते निकष तपासले जात असून त्यानुसार हे दाखले दिले जात आहेत. यामध्ये कोणत्याही प्रकारचे वेळकाढू धोरण नसून कागदपत्रांची शहानिशा केल्यावरच दाखले दिले जात आहेत. मराठा समाज दाखल्यांसाठी १९६७ पूर्वीचा जन्म आणि जात पुरावा असणे आवश्यक आहे.
ज्या भागामध्ये जन्म झाला असेल त्या भागातील महसुली पुरावा सादर केल्यानंतर कागदपत्रांची सत्यता तपासल्यानंतर नियमाप्रमाणेच दाखले दिले जात आहेत. यामध्ये प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची त्रुटी राहू नये, या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू असल्याचे प्रांताधिकारी नीता शिंदे यांनी सांगितले.
मराठा समाज जातप्रमाणपत्र देताना जन्मनोंद व महसुली पुरावा सादर करण्यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याचा मुद्दा रुपेश आमडोसकर यानी उपस्थित केला. त्याचप्रमाणे यासाठी तहसील कार्यालय येथे स्वतंत्र कक्ष उभारण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.
शिक्षण व नोकरीनिमित्ताने सिंधुदुर्गातील अनेक मराठा बांधव मुंबई व अन्य भागात स्थायिक झाले आहेत. त्यामुळे अशा लोकांना जातप्रमाणत्र हवे असल्यास प्रशासनाकडून त्याना योग्य मार्गदर्शन दिले जात नाही. याबाबत शैलेश भोगले यानी प्रांताधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. शिवजयंती निमित्ताने मराठा समाजातील निदान १०० बांधवाना दाखल्यांचे वाटप करावयाचे असुन यासाठी सहकार्याची अपेक्षा ॲड. सुहास सावंत यांनी व्यक्त केली. नगरसेवक सुशांत नाईक यानी हे जातप्रमाणत्र देत असताना संबंधित प्रशासनाने सहकायार्ची भूमिका ठेवावी अशी मागणी केली.