कोल्हापूर : बहुजननामा ऑनलाईन – देशाची राजधानी दिल्लीत साजऱ्या होणाऱ्या शिवजयंती सोहळ्यासाठी कोल्हापुरातून हजारो शिवभक्त दिल्लीकडे रवाना झाले. राजर्षी शाहू रेल्वेस्थानकावरून खास सोडलेल्या ताराराणी एक्स्प्रेसला कोल्हापूरच्या महाराणी याज्ञसेनीराजेंच्या हस्ते ध्वज दाखवून प्रवासाची सुरुवात करण्यात आली.
छत्रपती शिवरायांची जयंती केवळ महाराष्ट्रापुरती साजरी न करता ती संपूर्ण देशभरात साजरी व्हावी, यासाठी खासदार संभाजीराजे छत्रपतींनी पाऊल उचलले आहे. मागील वर्षीपासून दिल्लीत मोठ्या उत्साहात शिवजयंती उत्सव साजरा होत आहे. १९ फेब्रुवारीला साजरा होणाऱ्या या सोहळ्यासाठी कोल्हापुरातून १५०० हून अधिक शिवभक्त ताराराणी एक्स्प्रेस या खास रेल्वेने दिल्लीकडे रवाना झाले आहेत. यामध्ये ३०० वारकरी, शाहिरी-पोवाडा पथक, ध्वज पथक, ढोल ताशा पथक, हलगी पथक, धनगरी ढोल, लेझीम पथक, वासुदेव, गोंधळी अश्या अनेक लोककलावंतांचाही समावेश आहे.
यावेळी युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती म्हणाल्या, शिवरायांच्या जयंतीसाठी दिल्लीकडे जाणाऱ्या रेल्वेला त्यांच्या स्नुषा ताराराणींचे नाव दिले आहे, ही आम्हाला अभिमानास्पद गोष्ट आहे. यानिमित्ताने रणरागिणी ताराराणींचा इतिहास उत्तर भारतापर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे. शिवजयंतीनिमित्ताने अवघी दिल्ली दुमदुमून निघणार आहे. यावेळी मधुरिमाराजे छत्रपती, महापौर सरिता मोरे, जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक, अरुंधती महाडिक, प्रतिमा पाटील, वैशाली क्षीरसागर उपस्थित होत्या.