लखनऊ : वृत्तसंस्था – घरगुती गॅस ग्राहकांसाठी एक खुशखबर आहे. होळीच्या सणापूर्वी घरगुती गॅस सिलेंडर स्वस्त झाला आहे. विना अनुदानित घरगुती गॅस सिलेंडर (14.2 किलोग्रॅम) 52.50 रुपयांनी स्वस्त झाला असून आता तो 841 रूपयांना मिळेल. घरगुती गॅस सिलेंडर आतापर्यंत 893.50 रुपयांना मिळत होता. यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात तब्बल 144.50 रुपयांची वाढ झाली होती. त्यामुळे सध्याचा दिलासा तसा अल्प असल्याचेच दिसते. सिलेंडरचे नवीन दर रविवारी सकाळपासून लागू झाले आहेत.
तेल कंपन्यांनी मासिक रेट रिव्हीजन केले आहे. यामध्ये घरगुती गॅस सिलेंडरसह कामर्शियल सिलेंडरचे (19 किलोग्रॅम) दर सुद्धा 84.50 रुपयांनी कमी केले आहेत. आता उद्योगासाठी वापरण्यात येणार्या गॅस सिलेंडरसाठी 1465.50 रुपये लागतील. तसेच 5 किलोचा छोटू सिलेंडरही 18.50 रुपयांनी स्वस्त झाला असून तो आता 308 रुपयांना मिळेल.
325.71 रुपयांचे अनुदान
घरगुती गॅस सिलेंडरचे (विना अनुदानित) दर आज 52.50 रूपयांनी कमी झाल्याने ग्राहकांच्या खात्यात 325.71 रुपये अनुदान जमा होणार आहे. म्हणजे अनुदानित सिलेंडर ग्राहकांना सुमारे 515 रुपयांना मिळेल.
12 सिलेंडरवर अनुदान देते सरकार
सरकार एक वर्षात प्रत्येक कुटुंबासाठी 14.2 कि.ग्रॅ.च्या 12 सिलेंडरवर अनुदान देते. यापेक्षा जास्त सिलेंडर घेतल्यास ते बाजार भावाने खरेदी करावे लागतात. सरकार दरवर्षी 12 सिलेंडरवर अनुदान देते, त्याची किंमतही दर महिन्याला बदलत असते. सरासरी अंतरराष्ट्रीय बेंचमार्क आणि परदेशी चलन दरातील बदलावर अनुदानाची रक्कम ठरते.