नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय खेळाडूनं त्याच्या आई व पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. खून केल्यानंतर पोलिसांसमोर त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. भारताला आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक जिंकून देणाऱ्या इक्बाल सिंग बोपाराई यांनी हे धक्कादायक कृत्य केले आहे. 62 वर्षीय इक्बाल सिंग हे सध्या अमेरिकेत वास्तव्यास असून त्यांनी पोलिसांसमोर गुन्ह्याची कबुली दिली आहे.
सिंग यांनी 1983 मध्ये कुवेत येथे झालेल्या आशियाई अथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत गोळा फेक प्रकारात देशाला कांस्य पदक जिंकून दिले होते. सिंग हे पंजाबमधील होशियारपूर येथील रहिवाशी आहेत. 80 च्या दशकात ते भारताचे आघाडीचे गोळा फेकपटू होते. रविवारी त्यांनी स्वत: पत्नी आणि आईचा खून केल्याची माहिती पोलिसांना फोन करून दिली. त्यांनी पोलिसांकडे गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
पोलीस ज्यावेळी त्यांच्या राहत्या घरी गेले तेव्हा त्यांचे हात रक्ताने माखले होते. त्यांच्या घरातील आतल्या खोलीत दोन महिलांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडले आहेत. इक्बाल सिंह हे सध्या अमेरिकेत टॅक्सी चालवण्याचा व्यवसाय करत असून त्यांनी आई नसीब कौर आणि पत्नी जस्पाल कौर यांचा खून केला. पोलिसांनी त्यांना अटक केली असून त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे. कोर्टाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. त्यांनी आपल्या आई आणि पत्नीचा खून का केला हे अद्याप समजू शकले नाही. इक्बाल सिंग यांनी पत्नी आणि आईचा खून करुन मुलांना फोन केला. मी दोघींची हत्या केली आहे. तुझ्या आईला आणि आजीला मी मारलं. पोलिसांना फोन कर आणि मला अटक करायला सांग, असं सिंग यांनी त्यांच्या मुलाला फोन करून सांगितलं. त्यानंतर त्यांनी मुलीला फोन करुन घटनेची माहिती दिली.