मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – ’डॉक्टरांपेक्षा कम्पाउंडर बरा’ अशा वक्तव्यामुळे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका होतेय. भाजपने त्यांच्या विधानावर जोरदार आक्षेप घेत माफी मागावी, अशी मागणी केलीय. अखेर संजय राऊत यांनी या प्रकरणावर आपल्या स्टाइलने खुलासा करत भाजपला फटकारले आहे.
डॉक्टर मंडळी आपलीच आहेत. जेव्हा ते अडचणीत आलेत त्यावेळी मी व्यक्तीश: त्यांची मदत केलीय. डॉक्टरांच्या विरोधात जेव्हा भरमसाठ बिलं आली म्हणून आंदोलनं केली. त्यावेळी मीच मध्यस्तीची भूमिका करून डॉक्टरांची बाजू घेतली होती. माझ्याकडून डॉक्टरांचा अपमान झालेला नाही’ असेही खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे.
’एका विशिष्ट राजकीय विचारांची लोकं मोहीम चालवत असतील तर ते योग्य नाही. माझ्याकडून डॉक्टरांचा अपमान झाला नाही. बोलण्याच्या ओघात माझ्याकडून चूक झाली. गैरसमज कुणी करू नये, माफी मागण्यास काहीजण सांगत आहेत. पण, मी अपमान कुणाचा केलेला नाही’ असेही संजय राऊत यांनी सांगितले आहे.
’डॉक्टरांचे आम्ही सदैव संरक्षण केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लंडनला जाऊन डॉक्टरांचा अपमान केला. आमचे डॉक्टर अधिक पैसे घेतात. त्यावर तिथल्या डॉक्टरांनी निषेध केलाय. मग, मोदींचा निषेध का करत नाही? असा पलटवार देखील संजय राऊत यांनी भाजपवर केलाय.
तसेच ‘शाब्दिक चूक समजून घ्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर, मनमोहन सिंग यांच्यावरही चूक होतात. माझ्या मनात डॉक्टरांच्या सर्व सहकार्याविषयी सन्मान आहे. मी कम्पाउंडरचा सन्मान केला आहे म्हणून एका पक्षाने मोठी भूमिका घेण्याची गरज नाही. या विषयातील राजकारण थांबवायला हवे’ असेही संजय राऊत म्हणाले.
त्यानंतर संजय राऊत यांनी आपला मोर्चा जागतिक आरोग्य संघटनेकडे वळवला आहे. जागतिक आरोग्य संघटना आता ‘राजकीय संघटना’ झाली आहे. एका देशाची बांधिल आहे. अमेरिकेने तर जाहीरपणे सांगितले आहे, हे हेच अनेक देशांत संसर्ग होण्यामागे जबाबदार आहे. रशियाने निषेध केला अमेरिकेने विरोध केला. मग, आता रशिया आणि अमेरिकेचा निषेध करणार का? असा थेट सवाल संजय राऊत यांनी उपस्थितीत केलाय.
’राष्ट्रवादीचे शरद पवार यांची कोरोना विषाणूची चाचणी निगेटिव्ह आली. पण, त्यांनी काळजी घ्यावी, पण ते ऐकणार नाहीत. शरद पवार कुटुंबीय वाद मिटवण्यात ते सक्षम आहे. पवार कुटुंबाची वज्रमूठ कायम असून मौनात ताकद आहे. राष्ट्रवादीचे अजित पवार हे राज्य सरकारचा महत्वाचा खांब आहे’, असेही खासदार संजय राऊत म्हणाले.