मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणामध्ये परखड वक्तव्यामुळे चर्चेत असलेल्या अभिनेत्री कंगणा रणौतनं मुंबईची तुलना पाक व्याप्त काश्मीरसोबत केली होती. यानंतर तिच्या या वक्तव्याचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली. कंगनाविरुद्ध शिवसेना आक्रमक झाली आहे. आता तर शिवसेनेने कंगनाला 9 तारखेला येऊ द्या, एअरपोर्टवर तिचं शिवसेना स्टाईलमध्ये समचारा घेतला जाईल, असा थेट इशारा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.
संजय राऊत एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. संजय राऊत म्हणाले, बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतशी व्यक्तिगत भांडण नाही आहे. तिनं मुंबईची तुलना थेट पाकव्याप्त काश्मीरशी केली आहे. महाराष्ट्राचा, मुंबईचा अपमान करणारा कोणी असेल, मुंबईला पाकिस्तान म्हणण्याचं कृत्य हे अत्यंत गंभीर आहे. कंगनाला 9 तारखेला येऊ द्या, एअरपोर्टवर तिचं शिवसेना स्टाईलमध्ये समाचार घेतला जाईल, असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
राऊत पुढे म्हणाले, शिवरायांच्या महाराष्ट्रात एखादी व्यक्ती अशा प्रकारे घाणेरड्या शब्दात टिप्पणी करत असेल तर हा एका पक्षाचा विषय नाही. 11 कोटी जनतेचा विषय आहे. कंगनाला मराठी समजत का ? तिनं स्वत:चा ट्विटर हँडल स्वत: हँडल करावा. कोणत्या राजकीय पक्षाच्या आयटी टीमला द्यायची गरज नाही, असे म्हणत त्यांनी भाजपचे नाव न घेता टोला लगावला.
भाजप नेते आशिष शेलार म्हणाले, कंगनाला मुंबईला अक्कल शिकवायची गरज नाही. मात्र, त्यांनी हे जरा अधिक जोरात बोलायला हवं होतं. महाराष्ट्र त्यांचा सुद्धा आहे, अशा शब्दात राऊत यांनी भाजपला टोला लगावला. हे आंदोलन फक्त शिवसेनेचे आहे का ? तर नाही, कालच्या आंदोलनात सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या. पोस्टरवर मत मागायला शिवाजी महाराज नसतात. तसेच काल राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील स्पष्ट केलं की कंगनाला महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही. मात्र, अमृता फडणवीस आणि रामदास आठवले यांनी केलेल्या वक्तव्यावर त्यांनी प्रतिक्रिया देणं टाळलं.