मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – जेएनयूमध्ये झालेल्या हल्ल्याविरुद्ध आंदोलनात जाऊन अभिनेत्री दीपिका पादुकोण हिने तेथील विद्यार्थ्यांची भेट घेतली. त्यानंतर तिच्यावर अनेकांनी टीका केली. एकीकडे तिचा विरोध करत असताना काहीजण तिच्या बाजूने बोलत होते. त्यातच आज सकाळी संजय राऊत यांनी दीपिकाच्या समर्थनार्थ निवेदन केले असून तिच्या बाजूने उभे राहिले आहेत.
संजय राऊत म्हणाले की, “हा देश तालिबानी पद्धतीने चालवला जाऊ शकत नाही.” मंगळवारी दीपिकाने जेएनयूमधील विद्यार्थ्यांची भेट घेतल्यावर अनेकांनी तिचे कौतुक केले. पण काहींनी ‘डाव्या पक्षांचे’ समर्थन केले म्हणून काहींनी तिच्यावर टीका केली होती. तसेच तिने दिलेल्या या भेटीला विरोधकांनी प्रमोशनल स्टंट असल्याचे म्हणत तिच्यावर टीका केली आहे. एवढेच नव्हे तर तिच्या नव्या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणीही ट्रॉलर्सने केली आहे. काही भाजप समर्थकांनी दीपिकाने उचललेल्या या पावलावर टीका केली आहे.
“अभिनेत्री आणि तिच्या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी चुकीची आहे. तालिबान पद्धतीने देश चालवता येणार नाही,” असे संजय राऊत एका वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले. मेघना गुलजार यांनी दिग्दर्शित ‘छपाक’ हा अजय देवगणचच्या ‘तानाजी’ या चित्रपटासोबत प्रदर्शित झाला. मध्ये प्रदेश आणि छत्तीसगढमधील सरकारने त्यांच्या राज्यात चित्रपट टॅक्स फ्री केले आहेत.