सोलापूर : बहुजननामा ऑनलाईन – सोलापुरमधील जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीने पक्षातील सहा सदस्यांवर भाजपला मतदान केल्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली असून निलंबनानंतर मोहिते पाटील यांचा गट खूपच आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. जयसिंह मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादीला घराचा आहेर देत “आधी अजित पवारांवर कारवाई करा, मगच आमच्या सदस्यांचं निलंबन करा,” असे म्हटले आहे.
तसेच अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या इतर सदस्यांवर कारवाईबाबतही प्रश्न निर्माण केले. “राज्याच्या सत्ताकारणात पक्षविरोधी भूमिका घेत उपमुख्यमंत्री शपथ घेणाऱ्या अजित पवार यांच्यावर कोणती कारवाई करण्यात आली ? अडीच वर्षांपूर्वी संजय शिंदे भाजपकडून जिल्हा परिषद अध्यक्ष झाले त्यावेळी कोणती कारवाई केली? यासोबतच दीपक साळुंखे यांचा पराभव करणाऱ्या राष्ट्रवादीच्या सदस्यांवर कारवाई केली का?” असे म्हणत जयसिंह मोहिते पाटील यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये मोहिते पाटील यांच्या गटातील सहा सदस्यांनी भाजपला मतदान केले. स्वरुपाराणी मोहिते पाटील, शीतल देवी मोहिते-पाटील, सुनंदा फुले, अरुण तोडकर, गणेश पाटील आणि मंगल वाघमोडे अशी कारवाई करण्यात आलेल्यांची नावे असून राष्ट्रवादीने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.