नाशिक : बहुजननामा ऑनलाइन – मुंबईत मीटर पासून ते वॉटर पर्यतच्या सर्व समस्या या शिवसेनेच्या शाखेअंतर्गत सोडवल्या जातात. त्याच धर्तीवर आता नाशिक शहरात १२२ प्रभागांमध्ये शिवसेनेच्या शाखांची उभारणी करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेचे नवनिर्वाचित महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी दिली. ते एका मराठी वृत्तपत्राशी बोलत होते. बडगुजर म्हणाले, शिवसेना नव्या दमाचा पक्ष आहे. ज्या शिवसैनिकांनी पक्ष, संघटना वाढवण्यासाठी कष्ट घेतले, त्यांचे योगदान लक्षात घेऊन पक्षाला अधिक वेगाने पुढे नेले जाईल. त्यात मुंबईच्या धर्तीवर शाखा सुरु करण्याचे आयोजन असल्याचे त्यांनी सांगितले.
२३ जानेवारीस शिवसेनाप्रमुख (कै.) बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती पूर्वीच, शाखांची स्थापना, शाखांना क्रमांक देणे, जुन्या शाखांना नव्याने रुप देणे, जुन्या-नव्या शिवसैनिकांची यादी तयार करुन महाविकास आघाडीच्या योजना जनतेपर्यंत पोहचवणे आदी कामे करण्यात येतील. २३ जानेवारीस जुन्या शिवसैनिकांचा पक्ष कार्यालयात कृतज्ञता सत्कार केला जाईल. सहा महिन्यांत संघटना पातळीवर नियोजन करुन पक्ष बळकट करण्याकडे भर देण्यात येईल. नंतर महापालिका निवडणुकीत नव्या जोशात उतरुन महापालिकेवर भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही, असा निर्धार बडगुजर यांनी केला.
‘दत्तक’ नाशिकची पिछेहाट
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१७ साली नाशिक ‘दत्तक’ घेतल्याचे जाहीर केले होते. मात्र, सत्ताकाळात आपल्या आश्वासनाला ते जागले नाही. भाजपच्या सत्ताकाळात शहराची पीछेहाट झाली. स्मार्टसिटी कंपनीची पाच वर्षाची मुदत संपुष्टात येत असताना एकही मोठा प्रकल्प मार्गी लागला नाही. ज्या प्रकल्पाचे काम झाल्याचे दाखवण्यात येते, त्यांची वाताहत झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर भाजपच्या कामांचा पर्दाफाश करण्यासोबत शिवसेनेच्या माध्यमातून शाश्वत विकास हा मुद्दा नागरिकांसमोर मांडणार असल्याचे, सुधाकर बडगुजर म्हणाले.