पिंपरी : बहुजननामा ऑनलाईन – संविधान सन्मान समन्वय समितीच्या वतीने संविधान सन्मान रॅली काढण्यात आली. लोकशाही जिंदाबाद अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. तर रॅलीत महिला व मुलींनी उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदविला.
हिंदूस्तान अँटीबायोटिक्स कंपनीशेजारील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करून रॅलीला सुरुवात झाली. रॅलीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षि शाहू महाराज या महापुरुषांच्या वेशभुषा करून विद्यार्थी या रॅलीत सहभागी झाले होते.
यावेळी संविधान बचाव, देश बचाव, लोकशाही जिंदाबाद, अशा घोषणा देण्यात आल्या. पिपंरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. मुक्तीवादी संघटनेकडून गीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला. त्यानंतर उपस्थितांनी संविधानाची प्रतिज्ञा घेऊन रॅलीचा समारोप केला.
कागद, काच, पत्रा संघटनेच्या सोनाली कुंजीर, रयत विद्यार्थी विचार मंचचे धम्मराज साळवे, मुक्तीवादी संघटनेचे कार्यकर्ते या रॅलीच्या वेळी उपस्थित होते.