ओबीसींच्या मागण्यांकरिता जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

चंद्रपूर : बहुजननामा ऑनलाईन – ओबीसी महासंघाचे समन्वयक प्राचार्य डॉ. अशोक जीवतोडे, महासचिव सचिन राजुरकर यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी शाखा आणि युवक शाखेतर्फे अप्पर जिल्हाधिकारी आणि सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांना ओबीसी समाजाच्या मागण्यांबाबत निवेदन देण्यात आले.
ओबीसी विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्ती १०० टक्के लागू करण्यात यावी, थकित शिष्यवृत्ती त्वरित देण्यात यावी, ओबीसी समाजाची जनगणना करण्यात यावी, ओबीसी विद्यार्थ्यांना स्वाधार योजना लागू करण्यात यावी, सामाजिक न्याय विभागामार्फत चालविल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षा, युपीएससी, एमपीएससी, प्रशिक्षण, स्किल डेव्हलपमेंट प्रशिक्षण, पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण, मोटार ड्रायव्हिंग प्रशिक्षण मोफत देण्यात यावे.
बजेटमध्ये वसतिगृहासाठी निधीची तरतूद करून त्वरित बांधकाम करण्यात यावे, एस. सी., एस. टी. संवर्गातील मुलामुलींप्रमाणे सर्व स्पर्धा परीक्षा शुल्कमध्ये सवलत दिली जावी, ओबीसी समाजाच्या शेतकऱ्यांना अनुसूचित जाती- जमातीप्रमाणेच योजनांचा लाभ देण्यात यावा, चंद्रपूर जिल्ह्यात एकही टक्का मराठा समाज नसताना १६ टक्के जागा आरक्षित केल्या आहेत व ओबीसी समाजाला केवळ ११ टक्के जागा आरक्षित आहे म्हणून राज्यातील इतर जिल्ह्याप्रमाणे आरक्षणाची टक्केवारी पूर्ववत करण्यात यावी आदी मागण्या पूर्ण करण्याकरिता राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे जिल्हाध्यक्ष निकिलेश चामरे, संघटक जीवन गाडगे, राजेश सोयाम, उमंग हिवरे, शुभम पवार, तृप्तेश मासिरकर, रोशन पाचभाई आदींनी अपर जिल्हाधिकारी चंद्रपूर आणि सहाय्यक आयुक्त यांना निवेदन सादर केले.
Comments are closed.