नवी दिल्ली : वृत्तसंस्था – टेलिकॉम सेक्टरमध्ये धुमाकूळ केल्यानंतर आणि ब्रॉडबँड सेक्टर, ई – कॉमर्स (एजिओ) आणि फीचर फोन सेगमेंट क्षेत्रात प्रवेश घेतल्यानंतर आता असे दिसते आहे की जिओला पेमेंट क्षेत्रात प्रवेश करायचा आहे. एन्ट्रॅकरच्या नव्या अहवालानुसार रिलायन्स जिओने यूपीआय आधारित पेमेंट सर्व्हिस सुरू केली आहे. युपीआयद्वारे वापरकर्ते पायमेन्ट करू शकतील. अहवालानुसार हे वैशिष्ट्य केवळ निवडक वापरकर्त्यांसाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहे.
जिओ यूपीआय पेमेंट सर्व्हिस मर्यादित वापरकर्त्यांसाठी
सध्या जिओने या संदर्भात अधिकृतपणे काहीही सांगितले नाही. परंतु ही कंपनी वापरकर्त्यांसमवेत या सेवेची चाचणी करीत असल्याने, लवकरच सर्व वापरकर्त्यांसाठी ही सुविधा उपलब्ध करून दिली जाईल, असा अंदाज बांधला जाऊ शकतो.
जर हा अहवाल योग्य ठरला तर जियो यूपीआय सेवा सक्षम करणारा पहिला टेलिकॉम ऑपरेटर आणि दुसरा पेमेंट बँक होईल. कंपनीकडे आधीपासूनच JioMoney नावाची वॉलेट सेवा आहे.
अहवालानुसार, कंपनीने यूपीआय सर्व्हिसेसला मायजिओ अॅपमध्ये इंटीग्रेट केले आहे. ही सेवा वापरताना, जियो ग्राहकांना शेवटी @Jio सह व्हर्च्युअल पेमेंट अॅड्रेस (व्हीपीए) मिळेल. तसेच, अन्य यूपीआय आधारित अन्य देय सेवांप्रमाणेच, या सेवेसाठी वापरकर्त्याचा मोबाईल नंबर आणि संलग्न डेबिट कार्ड नंबर असलेले बँक खाते आवश्यक असेल.
व्हाट्सअँप एनपीसीआयशी आधीच पेमेंट सेवा सुरू करण्यासाठी चर्चेत आहे. तथापि, सोशल मेसेजिंग प्लॅटफॉर्मला अद्याप एनपीसीआय कडून ग्रीन सिग्नल मिळालेला नाही. 2018 च्या तुलनेत यूपीआय सेवांमध्ये 2019 मध्ये 3 पट वाढ झाली आहे.