नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय जनता पक्षाचे उमेदवार कपिल मिश्रा एका ट्विट मुळे चांगलेच अडचणीत आले असून त्यांच्या विरोधात एफआयआर दाखल करावा असे आदेश दिल्ली पोलीसांना निवडणूक आयोगाने दिले आहेत.
दिल्लीमधील मॉडेल टाऊन मतदारसंघातून मिश्रा भाजपचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवित आहेत. दिल्लीमध्ये आठ फेब्रुवारीला विधानसभेसाठी मतदान होणार आहे. त्या दिवशी दिल्लीच्या रस्त्यावर भारत – पाकिस्तान मुकाबला होईल. आम आदमी पार्टी आणि काँग्रेसने शाहीन बागेच्या रुपाने मिनी पाकिस्तानच उभे केले आहे अशा आशयाची विधाने मिश्रा यांनी केली होती. सीएए च्या विरोधात निदर्शने करणाऱ्यांना उद्देशून त्यांची ही विधाने होती. या विधानांमुळे निवडणूक आचारसंहितेचा भंग झाल्याची नोटीस निवडणूक आयोगाने मिश्रा यांना बजावली होती आणि चोवीस तासात खुलासा करण्याचे आदेश दिले होते.
Delhi Chief Electoral Officer has asked Delhi Police to file FIR against BJP leader Kapil Mishra. He, on 23rd January, had tweeted '…On 8th February there will be a contest between India and Pakistan on the streets of Delhi.' #DelhiElections2020 https://t.co/cRZgudjczL
— ANI (@ANI) January 24, 2020
दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजप, काँग्रेस आणि आप यांच्या प्रचारामुळे वातावरण ढवळून निघाले आहे. ३९ वर्षीय कपिल मिश्रा यांच्या विधानांमुळे वातावरण चांगलेच तापले. वादग्रस्त विधानांमुळे मिश्रा अडचणीत येणार असे दिल्लीच्या राजकीय वर्तुळात म्हटले जात होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज जाहीर सभा घेऊन केजरीवाल यांच्यावर टीका केली. विकासाचा दावा करणाऱ्या केजरीवाल यांनी आश्वासनांची पूर्तता केलेली नाही असा प्रतिहल्ला शहा यांनी केला. वाय – फाय सुविधा, यमुना नदीची स्वच्छता, उत्तम दर्जेदार रस्ते अशी आश्वासने केजरीवाल यांनी मतदारांना दिली होती असा उल्लेख शहा यांनी भाषणात केला. दरम्यान, मिश्रा यांच्यावर कारवाईचे आदेश दिले गेल्याने भाजपची पंचाईत झाली.