मुंबई : बहुजननामा ऑनलाईन : राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने गर्दी टाळणं आणि मास्कचा वापर करणं हाच एक उपाय आहे. कोरोनापासून दूर राहण्यासाठी प्रत्येकाने मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. मात्र, मनसे अध्यक्ष राज ठाकरे मास्क न घालताच आज मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. याबद्दल राज ठाकरे यांना पत्रकारांनी विचारले असता त्यांनी अजब उत्तर दिलं. मी मास्क लावतच नाही, तुम्हाला सांगतोय, असं उत्तर त्यांनी दिले.
मराठी भाषा दिवसाच्या निमित्ताने शिवाजी पार्क येथे आयोजित कार्यक्रमाला राज ठाकरे यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांनी अनेक मुद्यावर पत्रकारांशी संवाद साधला. शिवजयंती व मराठी भाषा दिनाच्या दिवशी कार्यक्रमाला गर्दी करु नये, या सरकारच्या निर्देशाचाही त्यांनी खरपूस समाचार घेतला. यांना राजकीय कार्यक्रमांना मंत्र्यांनी केलेली गर्दी चालते, इतकंच वाटतं तर निवडणुका पुढे ढकला, अशा शब्दात त्यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. यावेळी मास्क न लावण्यावर राज ठाकरे यांनी दिलेल्या उत्तरावरून उलटसुलट चर्चेला उधाण आलं आहे. महापालिका प्रशासन राज ठाकरे यांच्यावर काय कारवाई करणार, असा प्रश्न विचारला जात आहे.
शिवाजी पार्क येथे मोठ्या प्रमाणात गर्दी असतानाही राज ठाकरे यांनी तोंडाला मास्क लावलेला नव्हता. तुम्ही मास्क का लावला नाही, या पत्रकाराच्या प्रश्नावर राज ठाकरे म्हणाले, मी मास्क लावतंच नाही, तुम्हाला सांगतोय, असं म्हणत तेथून काढता पाय घेतला. एकीकडे राज ठाकरे यांचे बंधू आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील जनतेला मास्क वापरण्याचे आवाहन करत आहेत. तर दुसरीकडे त्यांचे बंधू राज ठाकरे मात्र मी मास्क घालतचं नाही, असे सांगत मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला काडीचाही प्रतिसाद देत नसल्याचे दिसून येत आहे.
पत्रकाराची घेतली फिरकी
पत्रकारांशी संवाद साधत असताना एका पत्रकाराने त्यांना विचारले की, निवडणुकांच्या वेळी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्याचं आश्वासन दिलं जातं. मात्र, हा मुद्दा केवळ राजकारणासाठीच वापरला जातो, असं का ? यावर राज ठाकरेंनी पत्रकाराची फिरकी घेत नेमकं काय राजकारण केलं जातं, असा उलट प्रश्न विचारला.