पुणे : बहुजननामा ऑनलाइन – मर्जीतील ठेकेदारांना टेंडर मिळावे यासाठी अधिकार्यांनी निविदा प्रक्रियेत घोळ घातल्याने महापालिकेच्या एक हजार कंत्राटी ड्रायव्हर्सना दोन महिन्यांपासून वेतन मिळाले नाही. या ड्रायव्हर्सना नियमीत वेतन मिळावे आणि स्थायी समितीने मान्य केलेल्या धोरणानुसार ‘समान काम समान वेतन’ लागू करावे अशी मागणी माजी नगरसेवक दत्ता बहिरट यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
कोरोनाची पर्वा न करता या कालावधीत काम करणार्या महापालिकेकडील सुमारे एक हजार कर्मचार्यांना मागील दोन – तीन महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. यामुळे कंत्राटी ड्रायव्हर्सने काम बंद आंदोलन पुकारले आहे. माजी नगरसेवक दत्ता बहिरट आणि महाराष्ट्र कामगार मंचचे अध्यक्ष दिलीप मोहिते यांच्या नेतृत्वाखाली या ड्रायव्हर्सने आज सकाळी महापालिकेच्या गुलटेकडी येथील व्हेईकल डेपो आणि नंतर महापालिकेसमोर आंदोलन केले. बहिरट आणि मोहिते यांच्या नेतृत्वाखाली आंदोलकांच्या शिष्टमंडळाने आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेउन ड्रायव्हर्स नेमणुकीच्या निविदेमध्ये ऑगस्टपासून सुरू असलेला घोळ निदर्शनास आणून दिला. ही निविदा मर्जीतील ठेकेदाराला मिळावी यासाठी आयुक्तांच्या आदेशाकडेही दुर्लक्ष करण्यात आल्याचे सप्रमाण निदर्शनास आणून दिले. या घोळामुळेच ड्रायव्हर्सना वेतन मिळत नसल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. तातडीने वेतन मिळावे तसेच स्थायी समिती आणि महापालिका आयुक्तांनी मान्य केलेल्या समान काम समान वेतन या धोरणानुसार वेतन मिळावे अशी मागणी केली. आयुक्तांनी ही मागणी तत्वत: स्वीकारल्यानंतर आंदोलन थांबविण्यात आले आहे, अशी माहिती बहिरट यांनी दिली.
वेतन आणि नवीन कंत्राटाची निविदा स्थायी समितीपुढे
व्हेईकल डेपोचे प्रमुख नितीन उदास यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आरोपांचे खंडन केले आहे. निविदा प्रक्रिया कायदेशीररित्याच्या राबविण्यात आली आहे. ड्रायव्हर्सच्या वेतनाचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे. तर नवीन कामाची निविदा ३० डिसेंबरपर्यंत मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे. आपत्कालीन परिस्थितीत महापालिका पीएमपीएलच्या ड्रायव्हर्सकडून सेवा घेते. कंत्राटी ड्रायव्हर्सने संप केल्याने आजही पीएमपीच्या ड्रायव्हर्सना पाचारण करण्यात आले होते. या ड्रायव्हर्सकडे हेवी वाहन चालविण्याचे परवाने आणि अनुभव आहे. अपघाताची चौकशी पोलिस करत आहेत.
…म्हणून एका निष्पाप नागरिकाला जीव गमवावा लागला !
कंत्राटी ड्रायव्हर्सने काम बंद आंदोलन केल्याने व्हेईकल डेपोने तातडीच्या सेवेसाठी पीएमपीकडील बसचालकांना बोलावून घेतले. कचरा वाहतुकीसाठीची हायड्रोलिक प्रकारातील ट्रकचा सारसबागेसमोर आज अपघात झाला. या अपघातात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. कचरा वाहतुकीच्या ट्रकवरील चालक हा पीएमपीकडील होता. त्याला ट्रक चालविण्याचा अंदाज न आल्याने हा अपघात होउन एका नागरिकाचा मृत्यू झाला, असा आरोपही दत्ता बहिरट यांनी केला आहे.