पिंपरी : बहुजननामा ऑनलाइन – रिक्षातून आलेल्या तिघा जणांनी तोंडावर रुमाल लावून विद्यार्थीनीला पळवून नेऊन तिच्यावर सामुहिक बलात्कार करण्यात आल्याचा प्रकार आला आहे. हा प्रकार निगडीतील टिळक चौकातील उड्डाणपुलाखाली रिक्षा स्टँडसमोरील सार्वजनिक रस्त्यावर शुक्रवारी सकाळी सात ते सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास घडला.
याप्रकरणी २१ वर्षाच्या विद्यार्थीनीने निगडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, ही विद्यार्थीनी रावेत परिसरात रहात असून ती आकुर्डी येथील एका संस्थेत शिकत आहे. शुक्रवारी सकाळी ती टिळक चौकातील उड्डाण पुलाखालील रस्त्यावरुन पायी जात होती. यावेळी रिक्षातून तिघे जण आले. त्यांनी तिला अडवून गुंगीचे औषध असलेला रुमाल तिच्या तोंडावर लावला. त्यामुळे तिला गुंगी आली. त्यांनी तिला जबरदस्तीने रिक्षा बसवून अज्ञात स्थळी नेले. तेथे तिच्यावर सामुहिक बलात्कार केला. त्यानंतर तिला जेव्हा शुद्ध आली तेव्हा ती एका फुटपाथवर होती. तिला रडत असल्याचे पाहून काही लोकांनी तिला पुन्हा निगडीतील टिळक चौकात आणून सोडले. त्यानंतर तिने एका हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार घेतले. त्यानंतर तिने ही घटना आपल्या काकाला सांगितली असून त्यानंतर तिने शनिवारी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
अतिशय गजबलेल्या चौकातून एका विद्यार्थीनीचे अपहरण करुन तिच्यावर सामुहिक बलात्कार झाल्याचे समजताच निगडी पोलीस हादरुन गेले. त्यांनी तातडीने परिसरातील सर्व सीसीटीव्हींची तपासणी केली. पण त्यात असा काही प्रकार झाल्याचे दिसून आले नाही. तसेच ही विद्यार्थीनी आपल्याला क्लोरोफॉर्म लावल्याचे सांगत आहे. क्लोरोफॉर्मने बेशुद्ध झाल्यावर व्यक्ती ५ ते ६ तास शुद्धीवर येत नाही़ मात्र, ही तरुणी लगेचच शुद्धीवर आली होती. तिच्यावर अत्याचार झाले का याची तपासणी करण्यासाठी तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. त्याचा अहवाल अद्याप पोलिसांना मिळायला आहे. या विद्यार्थीनीच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी तिघांवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.