पुणे : बहुजननामा ऑनलाइन – शहरात घरफोड्यासोबतच सोन साखळी चोरणाऱ्या चोरट्यांचा धुमाकूळ वाढला असून, चोरट्यांने सोसायटीत शिरून पायऱ्या चढणाऱ्या जेष्ठ महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सिंहगड रोड परिसरात ही घटना घडली आहे.
याप्रकरणी 68 वर्षीय महिलेने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला वडगाव बुद्रुक परिसरातील एका सोसायटीत राहायला आहेत. शुक्रवारी सकाळी दूध घेऊन त्या सोसायटीच्या आवारातून निघाल्या होत्या. ज्येष्ठ महिलेच्या मागावर असलेला चोरटा जिन्यात आला. त्यावेळी पायरी चढत असताना त्यांना तो तुम्ही पुढे चाला असे म्हणाला. जेष्ठ महिला पुढे चालत असतानाच त्याने त्यांच्या गाळ्यातील ३० हजारांचे मंगळसूत्र हिसकावून नेले. त्यांनी आरडाओरडा केला. पण तो सोसायटीच्या बाहेर लावलेल्या दुचाकीवरुन चोरटा पसार झाला. अधिक तपास उपनिरीक्षक के. एस. तनपुरे करत आहेत.