बहुजननामा ऑनलाइन टीम – पानटपरीवर असलेल्या उधारीच्या पैशातून झालेल्या वादात आठ जणांच्या टोळक्याने तरुणावर कोयत्याने वार करून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली(loan money) आहे. मध्यरात्री नांदेड सिटी परिसरात हा प्रकार घडला आहे.
अजय शिवाजी शिंदे (वय २३) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी राकेश तुळशीराम जाधव (वय २४) यांनी हवेली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय शिंदे व आरोपी राहुल सपकाळ यांच्यात पानटपरीच्या उधारीवरून वाद होते. गुरुवारी रात्री दोघांमध्ये नांदेड सिटी परिसरात उधारीवरून बाचाबाची झाली. त्यानंतर राहुल व त्याच्या इतर साथीदारांनी अजयवर कोयत्याने वार करून पाईपने मारहाण केली. त्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला. गंभीर जखमी झालेल्या अजयला रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी त्याचा मृत्यू झाला. हवेली पोलिसांनी राहुल आणि रोहित सपकाळ यांच्यासह आठ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. अधिक तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार करीत आहेत.