औरंगाबाद : बहुजननामा ऑनलाईन – कर्नाटकमधील निपाणी (जि. बेळगाव) येथे १० मार्च रोजी विद्रोही साहित्य संमेलन होणार आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदी कवयित्री प्रा. डॉ. प्रतिभा अहिरे यांची निवड करण्यात आली आहे.
समतावादी मूल्य संस्कृतीचा जयघोष करत विषमतावादी मूल्य संस्कृतीच्या विरोधात ठामपणे उभे राहत विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्रात १९९९ पासून कार्यरत आहे. महाराष्ट्रातील विविध भागांत १३ साहित्य संमेलने यशस्वी पार पडली आहेत. डॉ. अहिरे यांची बहुमताने निवड करण्यात आली आहे.
डॉ. अहिरे या आंबेडकरी स्त्रीवाद मांडणाऱ्या, सर्वंकष शोषणाच्या विरोधात सातत्याने आपली लेखणी परजणाऱ्या वर्तमान पिढीतील महत्त्वाच्या लेखिका आहेत. त्यांचे १३ ग्रंथ प्रकाशित असून, विविध विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात काही कवितांचा समावेश आहे.