पिंपरी : बहुजननामा ऑनलाईन – ती त्याच्यापेक्षा वयाने मोठी आणि विवाहित असली तरी त्याच्याबरोबर लग्न करणार होती. मात्र, या तरुणाचा तिच्यावर संशय होता. घराबाहेर चपला पाहून त्याने मध्यरात्री ३ वाजता तिला झोपेतून उठविले आणि घरात कोण आहे, त्याला बाहेर बोलवायला भाग पाडले. त्यातून त्यांच्यात जोरदार भांडणे झाली. तेव्हा बॉक्सर असलेल्याने त्याला मारहाण करुन टेरेसवरुन ढकलून दिले. गंभीर जखमी झालेल्या या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. पिंपरी पोलिसांनी 17 जणांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
अक्षय अनिल काशीद (वय २०, रा. पवारनगर, थेरगाव) असे खुन झालेल्या तरुणाचे नाव आहे. पिंपरीगावातील राही अपार्टमेंटच्या टेरेसवर ३० एप्रिलच्या पहाटे ३ वाजता हा प्रकार घडला. याप्रकरणी एका २८ वर्षाच्या महिलेने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी कृष्णा बाळु पारधे ऊर्फ बॉक्सर, बाळ्या, तौसिफ, सचिन सौदाई, अजय टाक, जतीन मेवानी, अनिल पिवाल, कपिल टाक, तरुण टाक, जय पिवाल, विनय बेद, सद्दाम शेख, खलील शेख, अरुण टाक, जतिन टाक, खुबचंद मंततानी अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.
याप्रकरणी एका २८ वर्षाच्या महिलेने फिर्याद दिली आहे. फिर्यादी या पती व मुलीसह झोपल्या होत्या. पाठीमागील बेडरुममध्ये फिर्यादी यांच्या मामाचा मुलगा कृष्णा पारधे व त्याची पत्नी सिमरन हे झोपले होते. पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास त्यांच्या बेडरुमच्या पाठीमागील दरवाज्यावर कोणीतरी दगड फेकून मारत होते. काही वेळाने कोणीतरी फ्लॅटसमोरील दरवाजा वाजू लागले. तेव्हा फिर्यादी यांनी दरवाजा उघडल्यावर बाहेर अक्षय काशीद उभा होता.
तो फिर्यादीला म्हणाला., इतका वेळ झाला तरी तू दरवाजा का उघडत नव्हतीस, तुझ्या बेडरुमसमोर कोणाच्या चपल्या आहेत. तेव्हा फिर्यादी यांनी आत माझ्या मामाचा मुलगा व त्यांची बायको झोपली आहे. तेव्हा तो म्हणाला की आतमध्ये कोण झोपला आहे. त्याला तू बाहेर बोलव, असे म्हणून तो जोरजोरात आरडा ओरडा करुन फिर्यादीला शिवीगाळ करु लागला. तेव्हा आत झोपलेला कृष्णा पारधे हा बाहेर आला़. तो अक्षयला म्हणाला की तु कोण आहेस, तू इथे काय करतोस, तेव्हा फिर्यादी कृष्णाला म्हणाल्या की, अक्षय व मी सोबत लग्न करणार आहे. तु त्याला काही बोलु नकोस. तेव्हा कृष्णा याने अक्षय याला शिवीगाळ करुन हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली.
फिर्यादीने अक्षयला इमारतीच्या टेरेसवर नेऊन त्याची समजूत काढू लागल्या. तेव्हा कृष्णा व त्याचे मित्र बाळ्या, तौसिफ तेथे आले. भांडणाचा आवाज ऐकून तेथे इतर सर्व जण आले. तेव्हा अक्षय याने फिर्यादीचा मोबाईल घेऊन पोलिसांना फोन केला. कृष्णा याने त्याच्याकडून मोबाईल हिसकावून घेऊन त्याला म्हणाला की, तू रात्रीचा येऊन माझ्या बहिणीला वाईट भाषेत बोलतोस असे म्हणून तो पुन्हा अक्षयला मारु लागला. तेव्हा अक्षय जिन्यातून उतरुन पळून जाऊ लागला.
त्याला इतरांनी जिन्यात अडवून मध्ये पडणार्यांना धमकाविले. आम्ही खुबचंद मंगतानीची माणसं आहोत. त्यांच्या सांगण्यावरुन आम्ही आलो आहोत. आमच्यामध्ये कोणी पडले तर त्याला जिवंत सोडणार नाही़ असे धमकाविल्याने लोकांनी दारे बंद करुन घेतली. त्यानंतर सर्वांनी अक्षयला पुन्हा टेरेसवर नेले. तेथे त्याला मारहाण करुन टेरेसवरुन ढकलून दिले व ते पळून गेले. गंभीर जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात नेण्यात आले. तेथे उपचार सुरु असताना त्याचा मृत्यु झाला.