कराची : वृत्तसंस्था – पाकिस्तानात काल झालेल्या भीषण विमान दुर्घटनेमध्ये 97 जणांचा मृत्यू झाला. पण अपघातातून नशीबाच्या जोरावर दोघेजण बचावले आहेत.
त्यांचे जिवंत राहणे फक्त आश्चर्यच नसून चमत्कार म्हणून पाहिले जात आहे.
कराचीमध्ये जिना आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ शुक्रवारी दुपारी भीषण विमान अपघात घडला. त्यामध्ये 99 प्रवासी असलेले पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सचे (पीआयए) पीके-8303 हे विमान दाट लोकवस्तीच्या भागात कोसळले. या भीषण विमान दुर्घटनेत 97 प्रवाशांचा मृत्यू झाला पण दोन जण चमत्कारिकरित्या बचावले आहेत.
पाकिस्तानील बँक ऑफ पंजाबचे प्रमुख झफर मसूद आणि झुबेर नावाचा एक व्यक्ती या भीषण अपघातातून बचावला आहे. बँक ऑफ पंजाबचे सीईओ झफर मसूद यांना फक्त फ्रॅक्चर झाले आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. लाहोरहून उड्डाण केलेले पीके-8303 हे विमान कराचीला उतरण्यासाठी अवघ्या एका मिनिटाचा कालावधी राहिलेला असतानाच मलीर येथील मॉडेल कॉलनीजवळच्या जिना गार्डन परिसरात कोसळले. यामुळे परिसरातील घरांचे नुकसान होऊन तेथील अनेक जण जखमी झाले आहेत. दुर्घटनाग्रस्त विमान रडारवरून अदृश्य होण्यापूर्वी वैमानिकाने हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून विमान उतरविण्यासाठी असलेल्या गिअरमध्ये समस्या असल्याची माहिती दिली होती. पाकिस्तानचे अध्यक्ष आरिफ अल्वी आणि पंतप्रधान इम्रान खान यांनी या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त करीत घटनेच्या चौकशीचेही आदेश दिले आहेत.