नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगभरात कोरोना व्हायरसच्या वॅक्सीनवर काम सुरू आहे, यामध्ये ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीत सुरू असलेल्या ट्रायलकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आतापर्यंत युनिव्हर्सिटीने ज्या 1,000 लस दिल्या आहेत, त्याआधारे आपल्या ट्रायलला खुप चांगले मानले आहे. पुढच्या टप्प्यात ट्रायलसाठी बालकांपासून ज्येष्ठांपर्यंत विविध वयाच्या 10,260 लोकांनी आपले नामांकन केले आहे. या टप्प्यात वॅक्सीनचा वेगवेगळ्या इम्यून सिस्टमच्या लोकांवर कसा परिणाम होतो, याचे परिक्षण करण्यात येईल.
ऑक्सफोर्ड वॅक्सीन ग्रुपचे प्रमुख अँड्रयू पोलार्ड यांनी म्हटले की, क्लिनिकल संशोधन खुप चांगले होत आहे. आता आम्ही ज्येष्ठ व्यक्तींमध्ये या वॅक्सीनला इम्यूनकडून कशी प्रतिक्रिया मिळते हे पाहणार आहोत. ही लस जास्त लोकसंख्येला संरक्षक ठरू शकते का, हे देखील पाहिले जाईल. आम्ही टेस्टच्या मदतीसाठी पुढे येणार्या स्वयंसेवकांना धन्यवाद देतो. ही नवी लस कोरोना व्हायरससारख्या महामारीपासून माणसाला संरक्षण देऊ शकते का, हे देखील पाहिले जाईल. सप्टेंबर महिन्यापर्यंत या वॅक्सीनमुळे एखादा चमत्कार होऊ शकतो, अशी अपेक्षा शास्त्रज्ञांना आहे, कारण तोपर्यंत तिचे सुरूवातीचे ठोस परिणाम मिळण्याची शक्यता आहे.
तिसर्या टप्प्यात ही लस 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या जास्तीतजास्त लोकांना कोविड-19 च्या संसर्गापासून किती चांगल्या पद्धतीने वाचवते यावर अभ्यास करण्यात येणार आहे. जेन्नर इन्स्टीट्यूटमधील वॅक्सीनॉलॉजीचे प्रोफेसर सराह गिलबर्ट यांनी म्हटले की, आम्हला 55 वर्षांपेक्षा जास्त लोकांमध्ये सुद्धा याबाबत कुतूहल दिसून आले, परंतु हे पहिल्या फेजच्या संशोधनासाठी योग्य नव्हते, मात्र आता आम्ही जास्त वयोगटाच्या लोकांना सुद्धा वॅक्सीनच्या मुल्यांकनासाठी सहभागी करून घेऊ शकतो. महत्वाचे म्हणजे ऑक्सफोर्ड यूनिव्हर्सिटीने मोठ्या प्रमाणात वॅक्सीनच्या उत्पादनासाठी अगोदरच मोठी औषध कंपनी अॅस्ट्राजेनेकाशी करार सुद्धा केला आहे, जी संशोधन यशस्वी झाल्यानंतर बाजारासाठी प्रॉडक्शन सुरू करणार आहे.