तिरुअनंतपुरम : वृत्तसंस्था – केरळमध्ये गरोदर हत्तीणीच्या मृत्यूप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. केरळचे वनमंत्री राजू यांनी याबाबत माहिती देताना सांगितले आहे की, केरळच्या पलक्कड येथे गरोदर हत्तीणीच्या मृत्यूप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. याअगोदर हत्तीणीच्या मृत्यू प्रकरणात तीन संशयितांची चौकशी करण्यात आली होती.
One accused arrested, in connection with death of the pregnant elephant in Palakkad: Kerala Forest Minister K Raju
(file pic) pic.twitter.com/hz8AIMaHPX— ANI (@ANI) June 5, 2020
काय आहे पूर्ण प्रकरण ?
या घटनेची देशभर चर्चा होत आहे. केरळच्या सायलेंट व्हॅली नॅशनल पार्कमधील एका गरोदर हत्तीणीला काही लोकांनी फटाक्यांनी भरलेले अननस खायला दिले होते. अननस चावल्यानंतर त्यात स्फोट झाल्यामुळे हत्तीणीच्या जबड्याला जबरदस्त इजा झाली होती. एका आठवड्यानंतर २७ मे रोजी मलप्पुरममधील वेल्लीयार नदीत हत्तीणीचा मृत्यू झाला.
त्यानंतर आलेल्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये हत्तीण गर्भवती असल्याचे समोर आले. ही बाब उघडकीस येताच लोकांमध्ये संताप पसरला. केवळ केरळमध्येच नाही, तर देशाच्या कानाकोपऱ्यातून दोषींना कठोर शिक्षेची मागणी होत आहे. केरळ सरकारने चौकशीसाठी वनविभागाची विशेष टीम तयार केली आहे.
हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर केरळ वनविभागाने ट्विट केले की, हत्तीणीच्या मृत्यूप्रकरणी वन्यजीव संरक्षण कायद्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनेक संशयितांची चौकशी केली जात आहे.
मुख्यमंत्री म्हणाले- कोणत्याही परिस्थितीत दोषींना शिक्षा होणार
या घटनेचा देशभर निषेध होत असून केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांनी बुधवारी म्हटले होते की, कोझिकोड येथील वन्यजीव गुन्हे अन्वेषण टीमला या प्रकरणाची चौकशी करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. दोषींना कोणत्याही परिस्थितीत शिक्षा होईल अशी ग्वाही त्यांनी दिली आहे.
बुडाल्यामुळे झाला मृत्यू !
मात्र, या प्रकरणात हत्तीणीच्या पोस्टमॉर्टमच्या प्राथमिक अहवालानुसार नदीमध्ये बुडण्यामुळे आणि शरीरात जास्त पाणी गेल्याने तिच्या फुफ्फुसांनी काम करणे थांबवले होते. पोस्टमॉर्टम अहवालातही पुष्टी झाली आहे की, तोंडात स्फोट झाल्यामुळे तिच्या जबड्याला खूप इजा झाली होती. असह्य वेदनांमुळे ती काहीही खाऊ-पिऊ शकत नव्हती. अत्यंत अशक्तपणानंतर हत्तीण नदीत गेली आणि तिथे बुडण्यामुळे त्याचा मृत्यू झाला.