बहुजननामा ऑनलाइन टीम – नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नवीन कामगार कायद्यांतर्गत आता कामगारांना आठवड्यातून तीन दिवस सुट्टी मिळण्याची शक्यता आहे. कामगार आणि रोजगार मंत्रालय या आठवड्यामध्ये चार नवीन कायदे लागू करण्यासाठी त्यांच्याशी संबंधित नियमांना अंतिम रुप मिळू शकते. हे कायदे लागू करुन देशाच्या कामगार क्षेत्रात सुधारित नियम आणि कायद्यांचे नवीन पर्व सुरु होणार आहे. या नव्या निमांमुळे कामगारांना आठवड्यातील चार दिवस कामकाजाचे असतील आणि त्यासोबत तीन दिवस रजा मिळेल.
कामगारांच्या नोंदणीसाठी पोर्टल
कामगार आणि रोजगार मंत्रालयाकडून असंघटीत कामगारांच्या नोंदणी आणि कल्याणासाठी इंटरनेट पोर्टल तयार करत आहे. हे पोर्टल जूनपर्यंत कार्यान्वयीत होण्याची शक्यता असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. असंघटीत क्षेत्रातील कामगारांसाठी नोंदणी आणि इतर सुविधा या पोर्टलवर देता येणार आहेत. या पोर्टलवर कंत्राटी कामगार, प्लॅटफॉर्म कामगार यांसारख्या कामगारांची नोंदी केली जाणार आहे. या पोर्टलसंदर्भात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पाच्या भाषणात उल्लेख केला होता.
नवीन कायदे 1 एप्रिल 2021 पासून लागू होतील
कामगार सचिव अपूर्व चंद्रा यांनी सांगितले की, नियम तयार केले जात असून, येत्या आठवड्यापर्यंत हे काम पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. यासंदर्भात सर्व संबंधितांशी चर्चा झाली आहे. लवकरच हे कामगार मंत्रालय चार नवीन कायदे लागू करण्याच्या स्थितीत असेल. यामध्ये पगार, वेतन कोड, औद्योगिक संबंधांचे कोड, कामाशी संबंधित सुरक्षा, आरोग्य आणि कामाच्या ठिकाणी अटी (OSH) आणि सामाजिक सुरक्षा असा कायद्यांचा समावेश असणार आहे. हे चार कायदे येत्या 1 एप्रिल पासून लागू होण्याची शक्यता आहे.
कामगारांना एक वर्षासाठी मोफत विमा
मंत्रालयाकडून तयार करण्यात येत असलेल्या पोर्टलवर अल्प मुदतीवरील कंत्राटे किंवा कामावर आधारित कामगार, बांधकाम कामगार तसेच इतर राज्यांतून मजुरीसाठी आलेल्या कामगारांची माहिती संकलित केली जाणार आहे. त्यांना एक वर्षासाठी प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेंतर्गत मोफत विमा संरक्षण देण्यात येईल. कामगार ब्युरो चार नवीन सर्वेक्षण करणार असून कामगार, घरगुती कामगार, व्यावसायिक आणि इतर राज्यांतून येणाऱ्या परिवहन क्षेत्राद्वारे मिळणाऱ्या रोजगारांशी संबंधित असे हे सर्वेक्षण असणार असल्याचे चंद्रा यांनी सांगितले.
44 कायदे 4 कायद्यांत एकत्रित
कामगार कायदे सुधारण्यासाठी मंत्रालयाने 44 प्रकारचे जुने कामगार कायदे चार कायद्यांत एकत्रित केले आहेत. या काद्यांची अंमलबजावणी अंतिम टप्प्यात असून कामगार मंत्रालय हे कायदे एकाचवेळी राबवणार आहे.