बहुजननामा ऑनलाइन टीम – येथील गणेशनगर परिसरात राहणाऱ्या एका क्रिकेट खेळाडूने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. संदीप सुभाष भिलारे (३५) असे या तरुणाचे नाव असून, ‘माझे आई-वडील व माझ्या मुलाची काळजी घ्या,’ असा स्टेटस मोबाईलवर टाकून त्याने आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप समोर आले नाही.
सविस्तर वृत्त असे की, संदीप भिलारे हा स्थानिक पातळीवरील क्रिकेट सामन्यातील अष्टपैलू खेळाडू आहे. त्याने आपल्या मोबाईल स्टेटसला ‘माझ्या-आई वडिलांची व मुलाची काळजी घ्या’ असा मजकूर ठेवला होता. संदीपचा हा स्टेट्स पाहून रविवारी रात्री काही मित्रांनी संदीपच्या जवळच्या नातेवाईकांना फोन करुन ही माहिती दिली.
त्यानंतर, नातेवाईकांनी तत्काळ संदीपचे घर गाठले, तेव्हा त्याचा दरवाजा आतून बंद होता. हाका मारल्या, दारावरची बेल वाजवली, तरीही घराचा दरवाजा उघडत नसल्याने तो तोडला असता, त्यावेळी संदीपने साडीने गळफास घेतल्याचे दिसले. दरम्यान, संदीप याचा प्रेमविवाह झाला होता. त्याला एक वर्षाचा मुलगा ही आहे.