अहमदाबाद : वृत्तसंस्था – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे आपल्या पत्नीसह भारत दौऱ्यावर आले असून त्यांनी अहमदाबादमधील साबरमती आश्रम येथून सुरुवात केली आहे. साबरमती आश्रममध्ये ट्रम्प आणि मेलानिया यांनी चरखा चालवला त्यावेळी मोदीही त्यांच्यासोबत होते. येथे ट्रम्प आणि मेलानिया यांचा वेगळा अंदाज पाहायला मिळाला. या अगोदर पहिले ट्रम्प यांचे विमान ११ वाजून ४० मिनिटांनी अहमदाबाद एयरपोर्टवर लँड झाले. नरेंद्र मोदी यांनी ट्रम्प कुटुंबाचे स्वागत करत एयरपोर्टपासून ते सरळ साबरमती आश्रमला गेले. तेथे जाऊन महात्मा गांधींना नमन केले. चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग आणि जपानचे पंतप्रधान शिंजो अबे यांच्यासह जगातील अनेक नेत्यांनी मागच्या काही वर्षात साबरमती आश्रमाला भेट दिली आहे.
ट्रम्प यांच्या दौऱ्याअगोदर स्थानिक अधिकाऱ्यांनी आश्रमाला सजवले. डोनाल्ड ट्रम्प तेथे १५ मिनिट होते. महात्मा गांधींनी साबरमती आश्रमातून भारताच्या अहिंसक स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व केले. महात्मा गांधी आणि त्यांची पत्नी कस्तुरबा हे साबरमती आश्रमात एकत्र राहत होते. साबरमती आश्रम २० व्या शतकाच्या सुरूवातीस बांधला असून आश्रमात आता गांधी मेमोरियल संग्रहालय, एका खोलीत चरखा आणि एका खोलीत टेबल आहे. गांधीवादी विचारसरणीच्या लोकांसाठी हे स्थान मंदिरापेक्षा कमी नाही.
डोनाल्ड ट्रम्प आणि मेलानिया ट्रम्प आज दोन दिवसांच्या भारत दौर्यावर आल्या असून साबरमती आश्रमानंतर ट्रम्पचा रोड शो मोटेरा स्टेडियमकडे रवाना होईल. येथे ‘नमस्ते ट्रम्प’ कार्यक्रमास संबोधित केल्यानंतर ते दुपारचे जेवण घेतील आणि त्यानंतर ताजमहाल पाहण्यासाठी आग्राला रवाना होतील. तेथून ते सायंकाळी उशिरा दिल्लीला निघतील आणि दिल्लीहूनच त्यांचे विमान एअरफोर्स वन अमेरिकेसाठी रवाना होईल.