मुंबई :बहुजननामा ऑनलाइन – कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मृत्यूचे प्रमाणही हळूहळू वाढू लागले आहे. शनिवारी पहाटे काँग्रेसचे नांदेडमधील आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. ते ५५ वर्षाचे होते. त्यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू होते. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. अंतापूरकर हे कॉंग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जात होते.
देगलूर विधानसभा मतदार संघातील आमदार अंतपूरकर यांची काही दिवसांपूर्वी कोरोनाचाचणी बाधित आली होती. सुरुवातीला त्यांच्यावर नांदेड येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्यांना मुंबईत हलवण्यात आलं. त्यांच्यावर मुंबईत उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले.
अशोक चव्हाण यांनी ट्विटरवर अंतापूरकर यांचे निधनाचे वृत्त देतानाच शोकही व्यक्त केला.
‘माझे निकटचे सहकारी व देगलूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे मुंबई हॉस्पिटल येथे थोड्या वेळापूर्वी निधन झाले आहे. रावसाहेब अंतापूरकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली व त्यांच्या कुटुंबीयांना हे अपरिमित दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, ही प्रार्थना’,असं त्यांनी म्हंटल आहे.