पिंपरी : बहुजननामा ऑनलाईन – मुलाला आपल्यापासून स्वतंत्र राहण्यास प्रवृत्त केल्याने आईवडिलांनीच मुलाला पत्नीला संपविण्याचा सल्ला दिला. आई वडिलांच्या सांगण्यावरुन पत्नीचा गळा आवळून खून करणाऱ्या पतीला भोसरी पोलिसांनी अटक केली आहे.
सारिका योगेश देसाई (२३, रा. धावडेवस्ती, भोसरी) यांचा मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी सारिका यांच्या आई अनिता राजकुमार बिराजदार (४०, रा. शिर्पनहळ्ळी, ता. दक्षिण सोलापूर, जि. सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे. तर पती योगेश इराण्णा देसाई (वय २६), सासरे इराण्णा देसाई, सासू विमल देसाई यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. १९) धावडेवस्ती मधील एका घरात सारिका यांचा मृतदेह आढळून आला होता. मृत सारिका आणि योगेश यांचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. लग्नानंतर योगेश आणि सारिका यांची घरगुती कारणावरून वारंवार भांडणे होत असत. त्याचबरोबर त्यांचे सासू-सास-यांसोबत देखील वारंवार वाद होत होते. दरम्यान, मागील काही दिवसांपूर्वी सारिका आणि योगेश यांनी वेगळे राहण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे दोघेही सोलापूरहून पुण्याला येऊन राहू लागले. याचा राग सासू-सास-यांच्या मनात होता. यामुळे सासू-सास-यांनी मुलगा योगेश याला सारिकाचा खून करण्यासाठी प्रवृत्त केले.
मंगळवारी सायंकाळी सारिका आणि योगेश दोघेच घरात होते. योगेशने सारिकाचा गळा आवळून खून केला. खून केल्यानंतर तो बाहेर निघून गेला. काही वेळाने परत येऊन पत्नी बेशुद्धावस्थेत पडल्याचे त्याने सर्वांना सांगितले. त्यानुसार, भोसरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन सारिका यांचा मृतदेह ताब्यात घेतला. शवविच्छेदन अहवालात सारिका यांचा मृत्यू गळा आवळल्याने झाला असल्याचे निष्पन्न झाले. भोसरी पोलिसांनी आरोपी पती योगेश याला अटक केली आहे.
Visit : bahujannama.com