मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटक सापडल्याच्या प्रकरणात सचिन वाझे यांना अटक झाल्यानंतर सत्ताधारी विरुद्ध विरोधक यांच्यामध्ये सामना रंगला आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोपाच्या फेरी सुरु झाल्या आहे. त्यातच मनसुख हिरेन प्रकरणात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सीडीआरच्या आधारे सचिन वाझे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. आता सीडीआरवरुन काँग्रेसने देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
महाराषट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी यासंदर्भात एक ट्वीट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी, देवेंद्र फडणवीस यांनी सीडीआरची माहिती तपास यंत्रणेकडे द्यावी व गुन्हेगारांना शिक्षा करण्यास मदत करावी. नागरिक म्हणूनही तपास यंत्रणांना स्त्रोत सांगणे त्यांचे कर्तव्य असल्याचे सावंत यांनी ट्विटमध्ये मध्ये म्हटले आहे. तसेच सीडीआर मिळवणं हा गुन्हा आहे. काही दिवसांपूर्वी गुन्हे शाखेने सीडीआर रॅकेट उघडकीस आणले होते, असे सांगून फडणवीस यांनी गुन्हा केल्याचा आरोप त्यांनी अप्रत्यक्षपणे केला आहे. सचिन सावंत यांनी केलेल्या ट्विट सोबत काही वृत्तपत्रांच्या बातम्यांचे कात्रण ट्विट केले आहे.
सावंत यांचा खोचक टोला
जनता नेत्यांकडून आदर्श घेत असते, नेत्यांकडून जनतेने योग्य आदर्श घेतला पाहिजे. सर्वसामान्यांना एक न्याय आणि नेत्यांना एक न्याय असणे योग्य नाही. कायदा हा सर्वांसाठी एकसारखाच आहे. विधानसभेत मोठ मोठ्याने बोलून प्रश्न दाबू नयेत. खुद्द मुख्यमंत्री राहिलेले देवेंद्र फडणवीस याचा विचार नक्की करतील, असा विश्वास आहे व विनंती देखील आहे, असा खोचक टोला सावंत यांनी लगावला आहे.