पिंपरी : बहुजननामा ऑनलाईन – मुलगी झाल्याच्या कारणावरुन सासरच्या लोकांनी केलेल्या छळाला कंटाळून एका विवाहितेने पेटवून घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाजवळ असलेल्या प्रेमलोक पार्कमधील अभिषेक या सोसायटीत बुधवारी (दि.10) रात्री पावणेबाराच्या सुमारास घडली. सासरच्या लोकांना वंशासाठी दिवा हवा होता. मात्र महिलेला मुलगी झाल्याने सासरच्या लोकांनी तिचा छळ सुरु केला. या छळाला वैतागून रागाच्या भरात महिलेने पेटवून घेतले.
याप्रकरणी चिंचवड पोलिसांनी आनंद छगनराव खैरनार, छगनराव सुखलाल खैरनार, कमलाबाई छगनराव खैरनार, अलका कैलाश ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पीडित महिलेने सोमवारी (दि.15) चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
चिंचवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेला सतत मुली झाल्याच्या कारणावरुन सासरच्या लोकांनी संगनमत करुन त्यांचा छळ केला. सासरच्या लोकांना वंशाचा दिवा हवा होता, या कारणावरुन मनस्ताप झाल्याने रागाच्या भरात विवाहितेने अंगावर रॉकेल ओतून माचिसच्या काडीने पेटवून घेतले. या घटनेत महिला 50 ते 55 टक्के भाजली असून त्यांच्यावर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत. महिलेवर उपचार सुरू असताना पोलिसांनी जबाब नोंदवून घेत सासरच्या लोकांवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विकास मडके करीत आहेत.