बहुजननामा ऑनलाईन – ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग जनार्दन काळे खुन प्रकरणी भाजपचे कवठेमहांकाळ तालुकाध्यक्ष जनार्दन एकनाथ पाटील यांसह आणखी 5 जणांना अटक करण्यात आली आहे. कवठेमहांकाळ पोलिसांनी याबाबत माहिती दिली आहे. या खुनाप्रकरणी अद्याप 14 संशयित आरोपींना अटक झाली आहे तर 25 जण फरार आहेत. बोरगाव (ता. कवठेमहांकाळ) च्या उपसरपंच निवडीवेळी झालेल्या मारहाणीत पांडुरंग काळे यांचा खून झाला होता.
मृत पांडुरंग काळे यांचा भाऊ अंकुश जनार्दन काळे यांनी याबाबत फिर्याद दिली होती. या खुनाप्रकरणी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात बोरगाव येथील 36 आणि मणेराजुरी येथील 3 अशा 39 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. यात भाजपचे कवठेमहांकाळ तालुकाध्यक्ष जनार्दन पाटील, बोरगावचे माजी उपसरपंच नितीन पाटील, माजी उपसरपंच नामदेव पोपट पाटील, सदस्य सुजित वसंत पाटील यांसह इतरांचा समावेश आहे.
अद्याप पोलिसांनी माजी सरपंच नितीन पाटील, माजी उपसरपंच नामदेव पाटील, सदस्य सुजित पाटील, नंदकुमार पाटील यांच्यासह 9 जणांना अटक केली होती. गेल्या 8 ते 10 दिवसांपासून इतर 30 संशयितांनी पोलिसांना गुंगारा दिला होता. सोमवारी पोलिसांनी आणखी 5 जणांना अटक केली. यात भाजप तालुकाध्यक्ष जनार्दन एकनाथ पाटील, प्रविण जनार्दन पाटील, संतोष शंकर पाटील, युवराज आनंदराव पाटील आणि अनिल ज्ञानू शिंदे यांचा समावेश आहे.