मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नातवाने केलेली उलटी साफ केली नाही म्हणून सुनेने आपल्या 62 वर्षीय सासूची निर्घृण हत्या केली आहे. मुंबईतील पायधुनी परिसरातील ही घटना आहे. पोलिसांनी सदर आरोपी सुनेला ताब्यात घेतलं आहे. आमरीन इस्माईल कोळसावाला असं या आरोपी सुनेचे नाव आहे. तर मृत सासूचे नाव सुमय्या कोळसावाला आहे. पायधुनीतील कोळसा स्ट्रीट, रॅपीड हाईट्स बिल्डींगमधील ही घटना आहे. रविवारी (3 नोव्हेंबर) रोजी ही घटना घडली.
एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, सुमय्या कोळसावाला ही आपला मुलगा ईस्माईल आणि सून आमरीन सोबत रॅपीड हाईट्स मध्ये प्लॅट नंबर 501 मध्ये पाचव्या मजल्यावर रहात होती. तिचा नातू 7 वर्षांचा आहे. रविवारी दुपारी या नातवाने उलटी केली. आमरीने सुमय्या यांना उलटी साफ करण्या सांगितले परंतु त्यांनी यासाठी साफ नकार दिला. दोघींमध्ये या गोष्टीला घेऊन वाद झाला.
हा वाद इतका पेटला की, आमरीनने रागाच्या भरात सुमय्या यांच्या पाठीत चाकू भोकसला. यात त्या गंभीर जखमी झाल्या. तेथील स्थानिकांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सुमय्या यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. यावेळी उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पायधुनी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपी आमरीनला अटक करत चाकू जप्त केला. तिच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला असून कोर्टाने तिला पोलीस कोठडी सुनावली आहे.