मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – रस्त्यावरील खड्डे ही एक प्रमुख समस्या आहे. यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. खड्डा चुकवताना वडिलांच्या दुचाकीवरून पडून एका 23 वर्षीय इंजिनिअर तरुणीचा मृत्यू झाला आहे. कर्नाटकच्या चिक्कमंगळुरू-कादूर रोडवरील रविवारी घडलेली ही घटना आहे. सिंधुजा के असं मृत मुलीचं नाव आहे. कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरींगमध्ये नुकतीच पदवी घेतलेल्या सिंधुजाला बंगळुरूमधील एका कंपनीत नोकरी लागली होती.
नोकरी लागल्यानंतर सिंधुजा आपल्या पासपोर्टच्या कामासाठी वडिलांसोबत चालली होती. यावेळी ही दुर्दैवी घटना घडली. पासपोर्ट काढणं हे सिंधुजाच्या जॉईनिंग प्रोससपैकीच एक होतं. धक्कादायक बाब अशी की, सिंधुजाच्या मृत्यूनंतर पोलिसांनी मात्र वडिलांविरोधातच बेदरकारपणे दुचाकी चालवल्याचा गुन्हा दाखल केला आहे. यानंतर स्थानिकांनी मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं. इतकेच नाही तर यानंतर खड्डे भरा जीव वाचवा असं ऑनलाईन कॅम्पेनही सुरु करण्यात आलं.
सुंधुजाच्या वडिलांचे नाव कुमारप्पा आहे. 52 वर्षीय कुमारप्पा रविवारी सिंधुजाच्या पासपोर्ट व्हेरीफिकेशन प्रोसेससाठी पोलीस स्टेशनला जात होते. खड्डे चुकवताना कुमारप्पा यांनी ब्रेक मारला. त्यावेळी दोघेही बाईकवरून पडले. या अपघातात सिंधुजा गंभीर जखमी झाली होती. तिला रुग्णालयात दाखल केल्यानंतर मात्र डॉक्टरांनी तिला हसन येथील रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. परंतु तिला दुसरीकडे हलवण्याआधीच तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी याबाबत अशी माहिती दिली आहे.