बहुजननामा ऑनलाईन टीम : पाकिस्तान क्रिकेट मंडळ ( PCB) आणि निवड समिती मानसिक छळ केल्याचा आरोप करत पाकिस्तान क्रिकेट टीमचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमीरने ( Mohammad Amir) गुरुवारी (दि. 17) आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्याच्या या दाव्याने पाकिस्तान क्रिकेट वर्तुळ ढवळून निघाले असून त्यावरून आता चर्चेला उधाण आले आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून बाहेर पडल्यानंतर आता आमीर पुण्याच्या संघाकडून खेळणार असल्याचे स्पष्ट केले आहे. 28 जानेवारी 2021पासून सुरू होणाऱ्या टी 10 लीमध्ये आमीर आता पुणे डेव्हिल्स ( Pune Devils) संघाकडून खेळणार आहे. आगामी T10 लीगमध्ये पुणे डेव्हिल्स हा नवा संघ मैदानावर उतरणार आहे. या संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून जाँटी ऱ्होड्सला करारबद्ध करण्यात आले आहे. तर श्रीलंकेचा अष्टपैलू थिसारा परेरा हाही याच संघाचा भाग आहे. T10 लीगचे चौथे पर्व अबु धाबी येथील शेख झायेद स्टेडियमवर खेळवले जाणार आहे.
याबाबत पुणे डेव्हिल्स संघाचे सहमालक कृष्णा कुमार चौधरी म्हणाले की, जगभरातील स्टार खेळाडूंचा समावेश असलेल्या लीगचा भाग झाल्याचा आनंद आहे. जाँटी आमचे मुख्य प्रशिक्षक असतील, तर थिसारा, आमीर हे मोठे खेळाडूही संघात आहेत.