बहुजननामा ऑनलाईन- आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांना धक्क्यांवर धक्के बसत आहेत. भाजप-शिवसेनेत विरोधकांच्या गोटातून येणारी मेगाभरती ओसरण्याची चिन्हे दिसत नाहीत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून पंक्षांतर मोठ्या प्रमाणात अजूनही सुरूच आहे. यातच आता पुन्हा कॉंग्रेसला पुन्हा एकदा मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कॉंग्रेसचे आमदार आनंदराव पाटील भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय गोटात सुरू झालीय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेतल्यानंतर पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला उधाण आलं आहे.
आनंदराव पाटील हे काँग्रेसचे विधान परिषदचे आमदार आहेत. तसेच ते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचे निकटवर्तीयही मानले जातात. नुकतीच त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची सोमवारी (ता.९) भेट घेतली. सुमारे वीस मिनिटे ही बैठक सुरू होती. यावेळी त्यांच्यासोबत पृथ्वीराज चव्हाणांचे कट्टर विरोधक अतुल भोसलेही उपस्थित होते. पाटील यांनी भाजपमध्ये पक्षांतर केल्यास चव्हाणांची कराड विधानसभा मतदारसंघात मोठी राजकीय कोंडी होऊ शकते. या चर्चांमुळे काँग्रेस पक्षाला पश्चिम महाराष्ट्रात आणखी मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सातारा जिल्हा काँग्रेसचे आनंदराव पाटील अनेक वर्षे अध्यक्ष राहिले आहेत. या ठिकाणी त्यांचा चाहता वर्ग मोठा आहे. यासाठी विजयनगर येथे शुक्रवारी (ता.१३) भव्य मेळावा घेऊन पाटील आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे मेळाव्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. विधानसभा निवडणूकीत शिवसेनेला नाईलाजाने भाजपसोबत युती करावी लागत आहे. त्यामुळे पक्षातील अनेक नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच युतीचे काही नेते तिकिटासाठी काँग्रेसच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. हे नेते कोण असतील याचा खुलासा लवकरच होईल असंही त्यांनी सांगितलं.