मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – हिवाळी अधिवेशनातील प्रथेप्रमाणे सभागृहाबाहेर सर्वपक्षीय आमदारांचा एकत्रित फोटो काढण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक आमदार यावेळी उपस्थित होते. मात्र या फोटोसेशनला भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे मात्र आले नसल्याचं पाहायला मिळालं.
भाजपची बैठक सुरु असल्याने देवेंद्र फडणवीस आजच्या फोटोसाठी येऊ शकले नाहीत, माहिती त्यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलही फोटोसाठी अनुपस्थित होते. या दोघांच्या अनुपस्थितीची सभागृहाबाहेर चांगलीच चर्चा सुरू होती.
दरम्यान, आता विधानसभेच्या आमदारांचा फोटो काढण्यात आला. विधान परिषदेचं कामकाज सुरू असल्यानं तिथले आमदारही या फोटोसेशनला उपस्थित राहू शकले नाहीत. प्रथेप्रमाणे विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावेळी सर्वपक्षीय आमदारांचा फोटो काढण्यात येत असतो. यावेळी पहिल्या रांगेत मुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष आणि ज्येष्ठ मंत्री असतात. तर इतर विधिमंडळाचे ज्येष्ठ नेते दुसऱ्या रांगेत असतात. त्यानंतर इतर तरूण आमदार उभे असतात. यंदाही तीच प्रथा ठेवण्यात आली.
Visit : bahujannama.com