नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पश्चिम बंगालमधून जो प्रकार समोर आला आहे तो वाचून तुम्ही नक्कीच चकित व्हाल. डॉक्टरांनी एका महिलेच्या पोटातून 1.5 किलो दागिने आणि 90 नाणी बाहेर काढली आहेत. पश्चिम बंगालच्या बीरभूमी सरकारी रुग्णालयात ऑपरेशन करून महिलेच्या पोटातून हे सगळं काढण्यात आलं आहे. ही महिला मानसिकदृष्ट्या अस्थिर होती. ही महिला चोरी करून दागिने खात होती. जेव्हा डॉक्टरांनी ऑपरेशन करून दागिने काढण्यास सुरुवात केली तेव्हा डॉक्टरही अवाक झाले.
महिलेच्या पोटातून काढले 1.5 किलो दागिने
मीडिया रिपोर्ट्सनुसार, एका 26 वर्षीय महिलेला पोटदुखीची तक्रार असल्याने बीरभूमीमधील रामपुरहाटच्या सरकारी मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सर्जरी विभागाचे प्रमुख विश्वास यांनी सांगितले की, “महिलेचं ऑपेरशन झालं आहे. यानंतर तिच्या पोटातून 5 आणि 10 रुपयांची 90 नाणी काढण्यात आली. इतकेच नाही तर पोटातून 1.52 किलो दागिनेही काढण्यात आले आहेत. यातील जास्त दागिने हे पितळ आणि तांब्याचे बनलेले आहेत तर काही सोन्याचेही आहे.
घरातून गायब होत होते दागिने
पोटातून एवढ्या मोठ्या प्रमाणात दागिने आणि नाणी मिळाल्याचे पाहून डॉक्टर्सही हैराण झाले आहेत. महिलेच्या आईने सांगितले की, तिच्या मुलीची मानसिक अवस्था दोन महिन्यांपासून ठिक नाही. आईनुसार, तिने नोटीस केलं की, घरातील दागिने गायब होत होते. जेव्हा मुलीला याबाबत विचारलं जायचं तेव्हा ती रडायला लागायची. यानंतर आईने मुलीवर नजर ठेवण्यास सुरुवात केली. परंतु सदर महिला आईची नजर चुकवून दागिने आणि नाणी खाण्यात यशस्वी होत असे. आईने सांगितल्यानुसार, तिने आपल्या मुलीवर अनेक डॉक्टरांकडून उपचार करून घेतले. परंतु तिच्या प्रकृतीत विशेष फरक पडला नाही. काही दिवसांपासून ती जेवण केल्यानंतर उलटी करत असे.