जळगाव : बहुजननामा ऑनलाईन – राज्यात महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षा मंगळवारपासून सुरु झाल्या आहेत. पण या परीक्षेचा पहिलाच मराठीचा पेपर फुटल्याची माहिती मिळत आहे. हा प्रकार जळगावमधील मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हाकाकोडा येथे घडला असून पेपर सुरू होण्यापूर्वी प्रश्नपत्रिका व्हाट्सएपवर व्हायरल झाली होती.
मुक्ताईनगरमधील कुऱ्हाकाकोडा येथे शिवाजी हायस्कुलमधील हा प्रकार असून त्यामुळे खळबळ उडाली आहे. आज मराठीचा पहिला पेपर होता. पण पेपर सुरु होण्याअगोदरच त्याची प्रश्नपत्रिका व्हाट्सऍपवर व्हायरल झाली असताना काही तरुणांनी शिक्षकांच्या मदतीने हा प्रकार समोर आणला. एक तरुण व्हाट्सएपवर आलेल्या प्रश्नपत्रिकेतील उत्तरे परीक्षा केंद्राबाहेर शोधत असताना हा प्रकार समोर आला.
तर शिक्षण विभागाकडून कॉपीमुक्त अभियान चालवले जात असताना हा प्रकार घडल्यामुळे प्रश्न निर्माण झाला आहे. या घटनेची चौकशी करून संबंधित केंद्र संचालक आणि पर्यवेक्षकांवर गुन्हे दाखल करण्यात येतील, अशी माहिती शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.