पुणे : बहुजननामा ऑनलाईन – पुणे महापालिकेच्या कळस-धानोरी प्रभाग क्रमांक १ च्या पोटनिवडणुकीत इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनमध्ये (ईव्हीएम) झालेल्या बिघाडाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भारिप बहुजन महासंघाचे शहराध्यक्ष अतुल बहुले यांनी केली आहे. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना देण्यात आले.
या पोटनिवडणुकीत काही मतदान केंद्रांमध्ये ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याचे निदर्शनास आले. त्याचबरोबरच ईव्हीएम मशीनला व्हीव्हीपॅट जोडण्यात आले नसल्याचे आढळून आले होते. प्रभाग क्रमांक १ मध्ये वंचित बहुजन आघाडीची ताकद असतानाही वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार रोहिणी टेकाळे यांचा पराभव झाला. हा निकाल संशयास्पद आहे. त्या बिघाडाची चौकशी करणे आवश्यक आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करावी. असे अतुल बहुले म्हणाले.
यावेळी शहराध्यक्ष बहुले, नवनीत आहिरे, अनिता चव्हाण, अजित पानसरे, विकास चोरघे, प्रमोद कांबळे, अजित वाघमारे, सचिन शिंदे आदी उपस्थित होते.