पुणे : बहुजननामा ऑनलाइन – पुण्यात काल झालेल्या पावसामुळे दत्तवाडीमध्ये घराची संरक्षण भिंत कोसळून एका कचरावेचक महिलेचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. संगीता नितीन रणदिवे (रा. जनता वसाहत, शंकर मंदिर) असे मृत महिलेचे नाव आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संगीता रणदिवे या महिला कचरा वेचण्याचे काम करतात. काल सायंकाळी मुसळधार पाऊसाने पुण्यात हजेरी लावली. त्यावेळी दत्तवाडी येथील संरक्षण भिंत कोसळली. ही भिंत संगिता रणदिवे यांच्या अंगावर पडून गंभीर जखमी झाल्या. स्थानिक नागरिकांनी त्यांना तात्काळ खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
भिंतीजवळ राडारोडा टाकण्यात आल्याने आणि पावसाच्या पाण्यामुळे भिंत कोसळल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या घटनेची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी पोहचण्यापूर्वीच संगिता रणदिवे यांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.