मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – माजी पंतप्रधान इंदिरा गांधी अंडरवर्ल्ड डॉन करीम लाला याला भेटण्यासाठी येत असल्याचे वक्तव्य शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केले होते. यानंतर काँग्रेसने यावर नाराजी व्यक्त केल्यानंतर संजय राऊत यांनी आपण केलेले विधान मागे घेत असल्याचे सांगितले. याच वक्तव्यावरून काँग्रेसचे नेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी शिवसेनेला इशारा दिला आहे. संजय राऊत यांनी केलेले विधान चुकीचंच होतं. यापुढे असं वक्तव्य खपवून घेतलं जाणार नाही, असा इशारा दिला आहे.
मुंबईतील अंडरवर्ल्ड हे शिकागोच्या अंडरवर्ल्डपेक्षा अधिक भयंकर होतं. त्या काळात गुंडाला भेटायला अख्खं मंत्रालय खाली येत असे. करीम लालाला भेटण्यासाठी इंदिरा गांधी आल्या होत्या,असे वक्तव्य संजय राऊत यांनी काल एका कार्यक्रमात केले होते.
त्यांच्या या वक्तव्यावरून काँग्रेसने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. तसेच राऊत यांनी हे विधान मागे घ्यावे अशी मागणी काँग्रेसच्या काही नेत्यांनी केली होती. त्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन राऊत यांनी आपल्या वक्तव्याचा खुलास केला. त्यानंतरही हा वाद थांबला नसल्याने अखेर त्यांनी आपलं वक्तव्य मागे घेतले. या पार्श्वभूमीवर बाळासाहेब थोरात यांनी पक्षाची भूमिका मांडली. संजय राऊत यांच्या या विधानामुळे आम्ही नाराज होतो आणि आहोत. ही बाब मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कानावर घातली आहे.
राऊत यांनी हे विधान मागे घेतल्याने आता हा विषय संपला आहे. मात्र, या पुढच्या काळात आम्ही हे खपवून घेणार नाही, असा इशारा त्यांनी शिवसेनेला दिला आहे. दरम्यान, माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राऊत यांच्या वक्तव्याचा धागा पकडून काँग्रेसला काही प्रश्न विचारले होते. या बाबात बाळासाहेब थोरात यांना विचारले असता ते म्हणाले, मुळात जे वक्तव्यच चुकीचं आहे. त्यावर स्पष्टीकरण कसलं द्यायचं, असे थोरात म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे अंडरवर्ल्डशी संबंध होते का ? काँग्रेसला अंडरवर्ल्डकडून पैसा यायचा का ? असे प्रश्न विचारून काँग्रेसकडे उत्तरे मागितली होती.
Visit : bahujannama.com