नवी दिल्ली : बहुजननामा ऑनलाइन – ज्ञान आयोगाचे माजी अध्यक्ष आणि गांधी कुटुंबियांचे निकटवर्तीय सॅम पित्रोदा यांनी भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघा संदर्भात मोठे वक्तव्य केले आहे. काँग्रेसचे सरकार आल्यास देशीतील सरकारी संस्थांमध्ये असलेल्या RSS च्या लोकांची सर्वप्रथम हकालपट्टी करणार असल्याचे पित्रोदा यांनी म्हटले आहे. तसेच सरकारी संस्थांमधील स्वच्छता, काँग्रेसचे प्रमुख काम असल्याचे पित्रोदा यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
सध्या सत्तेत असलेल्या नरेंद्र मोदी सरकारने देशातील अनेक सरकारी संस्थांमध्ये अशा लोकांची भरती केली आहे जे लोक सरकारी कामात दखल देतात. त्यामुळे विविध संस्थांच्या स्वायत्ततेवर परिणाम होतो. यावेळी त्यांनी परदेशातील एक उदाहरण दिले. शिकागोमधील भारतीय दुतावासात RSS ची पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीला नियुक्त करण्यात आले आहे. त्या व्यक्तीमुळे परदेशात राहणाऱ्या भारतीय नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा दावा पित्रोदा यांनी केला.
दरम्यान , पित्रोदा यांना अफ्सापा आणि देशद्रोहाचा कायदा हटविण्यासाठी काँग्रेसला किती दिवस लागतील, अस विचारण्यात आले.तेव्हा त्यांनी आश्वासने पूर्ण करणार असल्याचा पुनरुच्चार केला. मात्र काँग्रेसला किती यश मिळेल, हे त्यांनी स्पष्ट केले नाही.