पिंपरी-चिंचवड : बहुजननामा ऑनलाईन – पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका उच्चभ्रू हॉटेलच्या लेडीज वॉशरूममध्ये लावलेल्या छुप्या कॅमेऱ्यातून मुलीचे चित्रीकरण करण्यात आले आहे अशी माहिती समोर आली आहे. हॉटेलच्या व्यवस्थापकाने याबाबत पोलिसांत तक्रार दिल्यानंतर संबंधित हॉटेलच्या कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. राम देब नाथ (वय 24) असं या आरोपीचं नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी फेज 1 परिसरात असणारं बी हाईव्ह रेस्टॉरंट असं या हॉटेलचं नाव आहे. या हॉटेलच्या लेडीज वॉशरूममध्ये छुपा कॅमेरा लावल्याचे आढळून आले आहे. राम देब नाथ या आरोपीने लावलेला हा छुपा कॅमेरा ऑन होता. राकेश शेट्टी (वय 35) या हॉटेल व्यवस्थापकाने याबाबत पोलिसांत तक्रार दिली. हॉटेलमध्ये येणाऱ्या मुलींचे चित्रीकरण करण्याचा राम देब नाथचा हेतू होता. राकेश शेट्टी 102, इंगळेनगर कॉर्नर, कर्वेनगर पुणे येथील रहिवासी आहेत.
शेट्टी यांनी दिलेल्या तक्रारीनंतर राम देब नाथ (रा. श्रद्धा फॅसिलिटी सर्व्हिसेस, लक्ष्मी चौक, हिंजवडी, पुणे) याच्या विरोधात भादंवि 511 आणि आयटी अॅक्टमधील कलम 72 नुसार गन्हा दाखल करण्यात आला आहे. राम देब नाथ हाऊस कीपर म्हणून काम करत होता. पोलीस उपनिरीक्षक मिलन कुरकुटे यांनी याबाबत बोलताना सांगितले की, राम देबने छुप्या कॅमेऱ्यातून मुलींचे चित्रीकरण केले की नाही या गोष्टीचा ते शोध घेत आहेत.