बहुजननामा ऑनलाईन टीम – खासगी रुग्णालयामध्ये काम करणार्या डॉक्टरला रुग्णालय प्रशासनाकडे दोन महिन्यांपासून पगार दिला नाही. त्यामुळे डॉक्टरने नवविवाहित पत्नीसोबत रस्त्याच्या कडेला चहाविक्रीचा उद्योग सुरु केला आहे. हरियाणामधील कर्नाल शहरात डॉक्टरकडून चहा विकला जात आहे. डॉक्टरांचा अॅप्रन घालून रस्त्याच्याकडेला चहा विक्री करणार्याचे नाव गौरव वर्मा आहे. दोन महिन्यापासून पगार न मिळाल्याने चौकशी केली असता बदली करण्यात आली. बदलीचा विरोध केला तर मला नोकरीवरुन काढून टाकण्यात आल्याचा आरोप गौरवने केला आहे.
नोकरीवरुन काढून टाकल्यानंतर गौरवने सेक्टर 13 मध्ये चहाची टपरी सुरु केली आहे. या टपरीवर तो अॅप्रन घालून चहा विकतो. सरकारने संबंधित रुग्णलयावर कारवाई करावी अशी मागणी गौरवने केली आहे. रुग्णालय वरिष्ठांशी संवाद साधण्याचा प्रयत्नही डॉक्टरने केला. मात्र कोणतही म्हणणे ऐकून घेण्यात आले नाही असाही आरोप गौरवने केला आहे. पगारबद्दल चौकशी करताच बदली गाझियाबादमधील कंपनीच्या दुसर्या रुग्णालयात करण्यात आली. याला विरोध केल्यानंतर नोकरीवरुन काढून टाकण्याचे पत्रच गौरवला मिळाले. यासंदर्भात गौरवने मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्याकडेही तक्रार केली आहे. मात्र त्यालाही काहीच उत्तर मिळालेले नाही.
अखेर संतापलेल्या गौरवने रुग्णालयाच्या गेटसमोरच चहाचे दुकान सुरु केले आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अश्विनी अहूजा यांनी प्रकरणाची तक्रार आल्याचे सांगितले आहे. प्रकरणासंदर्भात सध्या कोणतेही मत देणे चुकीचे ठरेल. संपूर्ण चौकशी केल्यानंतरच याबद्दल मत व्यक्त करता येईल. चौकशीनंतरच मी याबद्दल काही बोलू शकेन. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरु आहे, अशी माहिती अश्विनी यांनी दिली.