नागपूर : बहुजननामा ऑनलाइन – खैरे कुणबी समाजातील मुला – मुलींसाठी शिक्षणाच्या ठिकाणी वसतिगृहे बांधून देणे तसेच सुशिक्षित मुलांना स्वयंरोजगारासाठी बिनव्याजी १० लाखांपर्यंत कर्जपुरवठा करण्याचेही शासनाच्या विचाराधीन असून समाजाच्या विकासासाठी राज्य शासनाकडून सर्वतोपरी मदत करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. स्व. विमलाबाई देशमुख सभागृह, धनवटे नॅशनल कॉलेज येथे आयोजित खैरे कुणबी समाजाच्या वधू-वर परिचय मेळाव्यात मुख्यमंत्री बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी मंत्री संजय देवतळे होते. तर, वाडीचे नगराध्यक्ष प्रेम झाडे, आमदार सुधाकर कोहळे, डॉ. परिणय फुके, माजी आमदार देवराव रडके यांची प्रमुख उपस्थिती होती.
मुख्यमंत्री म्हणाले, झाडे कुणबी, खैरे कुणबी तसेच ओबीसींसाठी राज्य शासनाने स्वतंत्र ओबीसी मंत्रालय स्थापन केले आहे. त्यासाठी ३ हजार कोटींचा निधी उपलब्ध करून दिला असून आता नॉन क्रिमिलेअरसाठी उत्पन्नवाढीची मर्यादा अडीच लाख रुपयांवरून ८ लाखांवर आणण्याचे काम सुरू आहे. राज्य शासन ओबीसींच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देत असून, त्यासाठी निधीही मोठ्या प्रमाणावर देण्यात येत आहे. राज्य शासनाने नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ओबीसींसाठी विविध योजना राबविण्यासाठी ७०० कोटींचा निधी मंजूर केला असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी रेशीमबाग येथील महात्मा फुले सभागृहात आयोजित समाजाच्या वधू-वर परिचय मेळाव्याचे उद्घाटन केले. यावेळी आमदार सुधाकर कोहळे, डॉ. परिणय फुके, राजेश चुटे, कैलास शिवणकर उपस्थित होते. ओबीसींच्या न्यायहक्कासाठी या शासनाने सहकार्य केल्याचे आमदार सुधाकर कोहळे यांनी सांगितले. राज्य शासन ओबीसींच्या तरुणांना स्वयंरोजगार निर्मितीसाठी मदत करणार असून, राज्यात ओबीसींसाठी ३६ वसतिगृहे बांधण्यात येणार आहेत. त्यापैकी १९ वसतिगृहांना नुकतीच मान्यता देण्यात आली असून त्यापैकी नागपुरात ४ वसतिगृहांचे लवकरच उद्घाटन करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा खैरे कुणबी समाजाच्या वतीने ओबीसी मित्र म्हणून सन्मान करण्यात आला